समीर वानखेडे यांची ठाण्यात आठ तास चौकशी; कोपरी पोलीस ठाण्यात झाले वकिलांसह हजर

तपास कामात सहकार्य करणार म्हणत नवाब मलिक प्रकरणावर बोलण्यास टाळले

sameer wankhede eight hours interrogation by thane kopri police on sadguru restro bar age matter
समीर वानखेडे यांची ठाण्यात आठ तास चौकशी; कोपरी पोलीस ठाण्यात झाले वकिलांसह हजर

ठाणे: नवी मुंबईतील बारच्या परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध शनिवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बुधवारी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते.याप्रकरणी त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना, त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत आपण तपासात सहकार्य करत असल्याचे ही स्पष्ट केले. तसेच त्यांनी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत त्यांना विचारलं असता त्यावर बोलण्यास मात्र त्यांनी प्रामुख्याने टाळले.

शनिवारी रात्री ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यावर याचसंदर्भात समीर वानखेडे यांना कोपरी पोलिसांनी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार वानखेडे हे त्यांच्या चार वकिलांसह बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे साडे सातच्या सुमारास पोलीस ठाण्यातून बाहेर आले, दरम्यान त्यांची कोपरी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी तब्बल आठ तास चौकशी केली.

या चौकशी सुमारे ५ ते ६ पानी जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास वानखडे यांना पुन्हा बोलविण्यात येईल. त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासात जे काही सिद्धी होईल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती कोपरी पोलीस सूत्रांनी दिली.

असे आहे प्रकरण…

वयाची जाणीवफपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील बारसाठी परवाना मिळवल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वयाच्या सतराव्या वर्षी वानखडे यांनी नवी मुंबईत सदगुरु नावाच्या बारवर परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यापाठोपाठ ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांच्या बारचा परवानाही रद्द केला.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने राज्य शासनाच्या वतीने वानखडे यांच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.