घरठाणेचारोटी टँकर स्फोटाला सात वर्ष पूर्ण

चारोटी टँकर स्फोटाला सात वर्ष पूर्ण

Subscribe

उड्डाणपूल झाला परंतु अपघात संख्येत घट नाही

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डहाणू तालुक्यातील चारोटी येथे 22 मार्च 2014 रोजी टँकर स्फोट झाला होता. स्फोटामधील आगीचे प्रमाण अतिशय जास्त होते. आपल्या आजूबाजूचा मोठा भाग आगीने व्यापला होता. ह्या घटनेत 10 लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. 6 जण हे एकाच कुटुंबातले होते. तर इतर चार जण होते. खाजगी वाहनातून मजुरीसाठी कामावर जाणाऱ्या कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. आज ह्या घटनेला 7 वर्ष पूर्ण झाले आहे.

महामार्गावरील चारोटी नाका येथील ह्या तीव्र वळणामुळे अनेकवेळा अपघात होत असल्यामुळे ग्रामस्थांकडून येथे उड्डाणपुलाची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी काही स्थानिक सजग नागरिकांनी एकत्र येऊन समिती स्थापन करून उड्डाणपुल व्हावा ह्यासाठी जोरदार मागणी होऊ लागली. त्या अनुषंगाने NHAI आणि IRB ने पाहणी करून उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी सुरुवात केली. परंतु चारोटी उड्डाणपुलाच्या डिजाईनला स्थानिक समितीने विरोध दर्शवला. परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता IRB ने आपली मनमानी करत स्वतःच्या डिजाईननुसार च उड्डाणपूल बनवला आणि 2016 ला उड्डाणपूल बनवून तयार झाला. उड्डाणपूल तयार झाल्यानतर उड्डाणपूलावर शेकडो अपघात झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या तीव्र वळणामुळे उड्डाणपूल बनवण्यात आला त्याच जागेवर पुलावर तसेच तीव्र वळण ठेवण्यात आले. त्यामुळे पूल बनवल्यांनंतरदेखील अपघातांच्या प्रमाणात घट झालेली पहायला मिळत नाही. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून देखील महामार्ग प्राधिकरणाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येणार नाही.

- Advertisement -

मागच्या महिन्यात या वळणावर एकूण तीन अपघात झाले आहेत. त्यात एकाचा चक्क पुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. तर एक टँकर व एक ट्रेलर पलटी झाला आहे. IRB कडून योग्य अभ्यास करून स्थानिकांच्या मागणीनुसार उड्डाणपुलावर तीव्र वळण न ठेवता उड्डाणपूल सरळ बनवण्यासाठी प्रयत्न केला असता तर कदाचित अपघातांची संख्या कमी होऊन निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. हा महामार्ग अतिव्यस्त महामार्गांमध्ये मोडतो. तरीसुद्धा येथे ताशी 20 किमी च्य वेगाने वाहन चालवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु त्याचाही काही उपयोग होत नाही. अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या उड्डाणपूलाची तज्ज्ञांकडून पाहणी करून तोडून पुन्हा योग्य नियोजन करून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी जागरूक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

चारोटी येथील उड्डाणपूल बांधते वेळेस आम्ही अनेकवेळा डिजाईन बदलण्याची मागणी केली होती. परंतु IRB ने लक्ष दिले नाही. आता उड्डाणपूल बनवला आहे. परंतु त्याच्यावरही तीव्र वळणामुळे अपघात मालिका सुरूच आहेत. हा उड्डाणपूल दुरुस्त करणे गरजेचे आहे. तसेच दरवर्षी महालक्ष्मी यात्रेच्यावेळी  महालक्ष्मी ते चारोटी दरम्यान अनेक अपघात होत असतात. त्या अनुषंगाने IRB ने दखल घेऊन चारोटी महालक्ष्मी सेवा रस्ता बनवून द्यावा जेणेकरून अपघात जास्त होणार नाही.
– संतोष देशमुख, अध्यक्ष, समाजमित्र मानवविकास संघटन महाराष्ट्र राज्य

- Advertisement -

उड्डाणपूल बांधतेवेळेस आम्ही आंदोलन करून उड्डाणपुलाच्या डिजाईनला विरोध केला होता. पण IRB ने आमची दखल न घेता मनमानी करत हा उड्डाणपूल त्यांच्या मर्जीने बांधला आहे. आतातरी IRB ने दखल घेऊन हा उड्डाणपूल पुन्हा दुरुस्त करावा अन्यथा उड्डाणपुलावरील ह्या अपघाती वळणामुळे भविष्यात अनेक निष्पाप जीव गमवावे लागतील.
– हरबन्स नंनाडे, पालघर जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -