घरठाणेमिलाप नगर तलावात गटाराचे सांडपाणी

मिलाप नगर तलावात गटाराचे सांडपाणी

Subscribe

तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर

डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर तलावात गटाराचे सांडपाणी जात आहे. त्यामुळे तलावाचे पाणी खराब आणि हिरवट होऊन त्याला दुर्गंधी येत आहे. तलावाचा समोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यावर तलावापेक्षा रस्त्यांची उंची अंदाजे एक ते दीड फूट वाढली आहे. रस्ता आणि तलावामध्ये असलेले जुने गटार बुजले गेले असून तेथे अद्याप नवीन गटार न बांधल्याने गटारातील सर्व सांडपाणी थेट तलावात जात आहे. तसेच सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर काही ठिकाणी लिकेज झाल्याने ते सांडपाणी देखील तलावात जात असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त दुषित होत आहे.तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मिलापनगर तलावात काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणत केले जात होते. त्या तलावाची साफसफाई वेळोवेळी केली जात नसल्याने त्यावेळी या तलावातील मासे, कासवे इत्यादी जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत होते. स्थानिक रहिवासी संघटनेने याबाबतची तक्रार राष्ट्रीय हरित लवादाकडे केल्यावर लवादाने याची गंभीर दखल घेऊन 2017 पासून या तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घातली आहे.
दोन वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे 25 लाख खर्च करून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. पण आता या तलावाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या तलावाची पुन्हा एकदा दुर्दशा झाली आहे. जर हा तलाव वाचवायचा असेल तर प्रथम गटाराचे सांडपाणी तलावात जाण्यापासून रोखले पाहिजे. निर्माल्य, कचरा या तलावात टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करावे लागणार आहे. या तलावात मोठ्या प्रमाणत मासे, कासवे इतर जलचर प्राणी आहेत. तसेच तलाव भोवती विविध पक्षांचे वास्तव्य असते. या तलावाकडे केडीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तलावातील पाणी सांडपाण्यामुळे अधिक दुषित होवून यातील जलचर नामशेष होतील. आधीच डोंबिवली शहरात तलाव कमी आहेत. त्यामुळे तलाव वाचवा असे आंदोलन करण्याची पाळी आली असल्याची प्रतिक्रिया स्थानिक सजग नागरिक राजु नलावडे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -