घरठाणेशहाडची पाणीयोजना उल्हासनगर महापालिकेकडे होणार हस्तांतरीत

शहाडची पाणीयोजना उल्हासनगर महापालिकेकडे होणार हस्तांतरीत

Subscribe

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाण्याचे दरही कमी होणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही दिली आहे. यामुळे उल्हासनगरला मुबलक पाणी मिळणार आहे.

ठाणेः  मुंबई महानगरातील विविध महापालिकांकडे स्वतःच्या पाणी पुरवठा योजना आहेत. उल्हासनगर शहराला शहाड पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. ती योजना उल्हासनगर महापालिका हस्तांतरीत करावी अशी मागणी पालिकेची होती. या मागणीला राज्याचे उद्योगमंत्री आणि एमआयडीसीचे प्रमुख उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबतचा अभ्यास करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयातील उद्योग मंत्र्यांच्या दालनात आयोजित बैठकीत उल्हासनगर पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आज ( शुक्रवारी ) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात पालिकेच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शहरातील पाण्याच्या विविध समस्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडल्या. उल्हासनगर शहराला शहाड येथील पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मुंबई महानगर क्षेत्रातील विविध महापालिका, नगरपालिकांचे स्वतःच्या पाणी पुरवठा योजना आहेत. त्याचप्रमाणे उल्हासनगर महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी शहाड पाणी पुरवठा योजना उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरीत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही योजना हस्तांतरीत करता येईल का, याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले. जर महापालिका ही यंत्रणा चालवू शकणार असेल ती त्यांना देण्यात हरकत नसल्याचेही सामंत म्हणाले.

- Advertisement -

उल्हासनगर शहराला उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडर देण्याची मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यावर बोलताना, एक्सप्रेस फिडर तातडीने मंजूर करून द्यावेत, असे आदेश उद्योग मंत्र्यांनी दिले. उल्हासनगर शहराची पाण्याची वाढती मागणी पाहता शहराला एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी करण्यात आली. त्यावरही उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करताना एमआयडीसी १२० दशलक्ष लीटर पर्यंतच्या पाण्यासाठी ८ रूपये तर त्यावरील पाण्यासाठी १२ रूपये प्रति हजार लीटर दर आकारते. मात्र शहराला एकच दराने पाणी द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश यावेळी मंत्री महोदयांनी दिले.

त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी होणार आहे.उल्हासनगर शहराला शहाड, पाले आणि जांभूळ येथून जलवाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाले येथील जोडण्यांमधून येणारे पाणी कमी दाबाने येत असल्याने येथील नागरिक सातत्याने तक्रारी करत असतात, अशी भूमिका माजी नगरसेवक अरूण आशान यांनी मांडली. त्यावर दिलासा देण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने पाऊले उचलण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना हा पाण्याचा दाब वाढवण्यात येईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. उल्हासनगर शहरातील पाणी प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करूनही निर्णय होत नव्हते. मात्र शुक्रवारी झालेल्या या पहिल्याच बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगत त्यांचे उल्हासनगरवासियांच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले.


…म्हणून खड्डेमुक्तीचं काम आतापर्यंत राहिलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना मिश्कील टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -