शहापूर । अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्यांचा भात खरेदी करून शेतकर्यांना आर्थिक आधार देण्याच्या हेतूने आदिवासी विकास महामंडळातर्फे शहापुरात पाच ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
भाताला २३०० रुपये क्विंटल दर देण्यात आला असून भात विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची केली आहे.
खर्डी, बोरशेती आणि वेहळोली येथील आदिवासी सहकारी सोसायटीच्या वतीने भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत असल्याने तालुक्यातील खासगी व्यापारी भात खरेदी करण्यासाठी शेतकर्यांकडे सध्या चकरा मारत असून घरची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपला भात १००० ते १२०० रुपये क्विंटल या कवडीमोलाने अनामत रक्कम घेऊन विकत आहेत. शहापुरातील ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण असल्याने शेतकर्यांना ऑनलाइन प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने शेतकर्यांना भाताची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मदतनीस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. शेतकर्यांनी सातबारा, फेरफार आणि पासबुक झेरॉक्स घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यावर मंजूर ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहिती उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनावणे यांनी दिली.