शहापूर । शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत चार चाकी गाडी फोडून त्यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत माजी सरपंच उघडे दोन्ही पाय आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी प्रथम शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र दोन्ही पाय आणि उजवा हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे.
अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्ताने आपल्या घरून त्यांच्या मालकीची चार चाकी घेऊन सकाळी १० वाजता निघाले होते. मात्र अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावावरील चढणीला आल्यावर काही अज्ञात व्यक्तीने त्यांची चार चाकी गाडी अडवून वाहनावर दगडांचा मारा केला. अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडा यांना गाडीबाहेर काढत जबरी मारहाण केली. या मारहाणीत माजी सरपंचाचे दोन्ही पाय आणि उजव्या हाताला जबरी मार लागल्याने त्यांना शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोन्ही पाय निकामी झाल्याचे सांगितल्याने त्यांना उपचारार्थ पुढील उपचारासाठी कल्याण येथे हलविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास शहापूर पोलीस करत असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.