HomeठाणेShahapur : आठवडी बाजारामुळे भीषण अपघाताची शक्यता

Shahapur : आठवडी बाजारामुळे भीषण अपघाताची शक्यता

Subscribe

मुंबई- नाशिक महामार्गावरील स्थिती

शहापूर । शहापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दर शुक्रवारी भरणार्‍या आठवडे बाजारात दुकानदार, ग्राहक आणि चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची गर्दी संध्याकाळच्या वेळेस होते. ही गर्दी वर्दळ थेट मुंबई-नाशिक
महामार्गाच्या अर्ध्या भागात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी भीषण अपघात होण्याची भीती आहे.
महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यातच बाजारामुळे बेशिस्त वाहतुकीचा धोकाही आहे. मुंबई-नाशिकच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची नेहमीच या मार्गावर ये-जा असते. तर बाजारात येणारे-जाणारे नागरिकही जीवाची पर्वा न करता या ठिकाणी वावरत असतात.

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवड्याच्या दर शुक्रवारी सर्व प्रकारचा भाजीपाला, सुकलेली मासळी, विविध प्रकारची फळे, गृहोपयोगी वस्तू, कडधान्य, धान्य व इतर वस्तूंचा बाजार भरतो. बाजाराची दुकाने मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणार्‍या मार्गांच्या कडेला आहेत. बाजार समितीच्या आवारापासून ते दूरपर्यंत दुकाने उभी केली जातात. त्या दुकानांमुळे गर्दी तर होतेच शिवाय बाजारात येणारे ग्राहक आपली दुचाकी, चारचाकी वाहने महामार्गाच्या कडेला लावत असल्याने हायवे व्यापला जातो. संध्याकाळी ही गर्दी वाढल्याने अपघाताचा धोका आहे. शहापूरच्या वाहतूक विभाग तसेच पोलीस ठाण्याने या परिस्थितीची दखल घ्यायला हवी. वाहतूक पोलीस अधिकार्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. येथे आठवडे बाजाराच्या दिवशी पोलीस कर्मचारी तैनात नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहतूक वाढते. कृषी उत्पन्न बाजार समितीनेही दुकाने आणि वाहने कुठे लावली जावीत यासाठी काही नियम केलेले नाहीत. त्यामुळे बेशिस्त दुकानदार आणि वाहनचालकांचे फावले आहे.

दर शुक्रवारी भरणार्‍या आठवडे बाजारावेळी मुंबई-नाशिक महामार्गावर नागरिक तसेच वाहनांच्या होत असलेल्या गर्दीमुळे अपघाताची भीती आहे. येथे पोलीस तैनात करावेत म्हणून १५ दिवसांपूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. परंतु पोलीस ठाण्यातून याबाबत प्रतिसाद मिळाला नाही.
-रविकांत चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर

आठवडे बाजाराची दुकाने, वाहने आणि नागरिकांची गर्दी थेट महामार्गावर येत असल्याने येथे भीषण अपघाताला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाने या समस्येची दखल घ्यावी.
-गणेश कामडी, सरपंच, ग्रामपंचायत, गोठेघर