शहापूर । शहापूर तालुक्याच्या आदिवासीबहुल भागात वारली, कातकरी, ठाकर, आदिवासी कोळी, कोकणा कोकणी, पावरी यांसारख्या भाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातो. त्यानुसार येथील आश्रमशाळांच्या आदिवासी विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेत शिक्षण देणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. याआधी येथील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातूनच शिक्षण दिले जात होते. त्यात बदल करून स्थानिक बोलीभाषेतील अभ्यासक्रमाचा नव्यानेच समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पहिली ते चौथीच्या पुस्तकांचे शहापूर तालुक्याच्या स्थानिक वारली, कातकरी, ठाकर, कोळी, कोकणा – कोकणी व पावरी भाषेत रुपांतर करण्यात आले आहे.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आश्रमशाळांचे शैक्षणिकसत्र सुरू झाले असून विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेतील रुपांतरीत पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास, तसेच मातृभाषेतील बालवाचन यातील फरक आणि पुस्तकांच्या अभावामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे स्थानिक बोलीभाषांमध्ये रुपांतर करून सोप्या पद्धतीने शिक्षण देणे सुरु केले आहे. स्थानिक बोलीभाषेतील पाठ्यपुस्तकांचे केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनुवाद करण्यात आला आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात टीआरटीआयने त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर केले आहे. शहापूर तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये पहिल्या टप्यात पहिली व चौथीची पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. दुसर्या टप्प्यातील पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहेत. या पुस्तकांचे वितरण आश्रमशाळा स्तरावर सध्या सुरू आहे. उर्वरित पाठ्यपुस्तके लवकरच प्राप्त होणार असल्याचे शहापूर आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी. आर. जाधव यांनी सांगितले. शहापूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत १३ अनुदानित, तर २३ शासकीय मिळून एकूण ३६ आश्रमशाळा आहेत. त्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये ९ हजार ५०० तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये ५००० विद्यार्थी आहेत. यांमध्ये पहिली ते चौथीचे शासकीय आश्रमशाळांतील १ हजार ७१३ आणि अनुदानित आश्रमशाळांतील १ हजार ५७० याप्रमाणे एकत्रित सुमारे ३ हजार २८३ विद्यार्थी आहेत. त्यांना बोलीभाषेतील पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे.