HomeठाणेShahapur : दुपारी रात्री स्टेशनवरील सरकते जिने बंद

Shahapur : दुपारी रात्री स्टेशनवरील सरकते जिने बंद

Subscribe

वृद्ध, महिला प्रवाशांची गैरसोय

शहापूर । मध्य रेल्वे मार्गावरच्या रेल्वे स्थानकांमध्ये सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. यामध्ये कल्याण ते आसनगावपर्यंत काही स्थानकात सरकते जिने रात्री आणि दुपारच्या सत्रात बंद ठेवण्यात येत असल्याचे अनेकदा नजरेस पडते. त्यामुळे प्रवाशांची विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि लहान मुले यांची गैरसोय होत आहे. हे सरकते जिने का बंद ठेवले जातात? याचे कारण अद्यापही कुणाला समजू शकले नाही.
प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने बहुसंख्य स्थानकात सरकते जिने बसविले आहेत. त्यामुळे मोठी प्रवासी संख्या असलेल्या स्थानकात पादचारी पुलाचा जिना आणि सरकता जिना याचा वापर केला जात असल्याने प्रवासी विभागले जातात. त्यासाठी अनेक स्थानकात अप-डाऊन अशी प्रवासी वाहतूक करणारे दुहेरी सरकते जिने बसविण्यात आले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांचे हाल या चालत्या जिन्यांद्वारे मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक होत असते. उपनगरांमधील स्थानकात प्रवाशांची अनुपस्थितीत. हे सरकते जिने चालत्या अवस्थेत राहत असल्याने ते विजेचा वापर करतात. मात्र, ग्रामीण भागातील स्थानकातील चित्र उलटे आहे. आसनगाव स्थानकात दिवसाआड दुपारी आणि रात्रीच्या वेळी सरकते जिने बंद ठेवले जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि जड ओझे घेऊन निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. विजेची बचत किंवा अन्य कुठल्या कारणाने हे सरकते जिने बंद असतात? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

लिफ्टचा आकार लहान असल्याने प्रवाशांची गैरसोय
सद्यस्थितीत २५ केव्ही वीज पुरवठ्यावर रेल्वे गाड्या धावत असल्याने सर्व स्थानकातील नवीन पुलांची उंची इमारतीच्या ३ मजली एवढी वाढविण्यात आली आहे. यामुळे पायी चढ-उतार करताना प्रवाशांची दमछाक होत असते. त्यामुळे काही प्रवासी पुलापेक्षा सरकता जिना आणि लिफ्टचा वापर करतात. परंतु, स्थानकात बसविण्यात आलेल्या लिफ्टचा वेग मंद असतो तर लिफ्टचा आकार लहान असल्याने प्रवासी क्षमता १० ते १५ इतकी आहे.

मोठ्या क्षमतेची लिफ्ट बसवण्याची मागणी
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हल्ली उच्च वेग घेणार्‍या आणि मोठ्या आकाराच्या लिफ्ट विकसित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मोठी प्रवासी संख्या असलेल्या रेल्वे स्थानकात अधिक वेगात खाली वर करणारी एकाचा वेळेस २५ संख्या क्षमता घेणारी लिफ्ट बसविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. यात मोठी प्रवासी संख्या असलेल्या ग्रामीण भागातील कसारा आणि आसनगाव स्थानकाचाही प्राधान्याने विचार व्हावा, अशी देखील मागणी पुढे येऊ लागली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढली आहे. स्थानकात एकाच वेळी दोन्ही दिशेच्या गाड्या आल्यावर प्रवाशांची तोबा गर्दी होऊन त्यातून चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण होते. त्यात काही स्थानकात दुपार आणि रात्रीच्या वेळी सरकते जिने बंद असतात. त्यामुळे गुडघे दुखी असलेले प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची गैरसोय होते. हे थोपविण्यासाठी स्थानकात २५ ते ३० प्रवासी क्षमता असलेली आणि अतिवेगाच्या लिफ्ट बसविण्याची गरज आहे.
– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, ठाणे