HomeठाणेShahapur : डोळखांबमध्ये भात खरेदी केंद्रावरील ऑनलाइन प्रक्रिया ठप्प

Shahapur : डोळखांबमध्ये भात खरेदी केंद्रावरील ऑनलाइन प्रक्रिया ठप्प

Subscribe

शेतकर्‍यांची ससेहोलपट

शहापूर । शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल परिसर समजल्या जाणार्‍या डोळखांब परिसरातील शेतकर्‍यांना महामंडळाला भात विक्री करण्यासाठी सातबारे ऑनलाईन करण्याची जाचक अट आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांना शेतीचे सातबारा ऑनलाइन करण्यासाठी डोळखांब येथील बाजारपेठेत रोज हेलपाटे घालावे लागत आहेत. याशिवाय या ठिकाणी आदिवासी महामंडळाने नियुक्त केलेले सुभाष पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गेले दहा ते बारा दिवस डोळखांब येथे फिरकलेच नाही. सातबारा ऑनलाइन करण्यासाठी आदिवासी महामंडळाकडून दोन व्यक्तींची नियुक्ती केल्याचे पाटील यांनी सांगितले. या ठिकाणी आदिवासी महामंडळाच्या अधिकारी ऑनलाईन प्रक्रियेसाठी उपस्थित नसल्याने शेतकर्‍यांना रोजच पदरमोड करून डोळखांब येथे हेलपाटे घालावे लागत आहेत. आपल्या हक्काचे भात पीक शासनाच्या हमीभाव भात खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट मात्र कोणाच्याही निदर्शनात येत नाही.
शहापूर तालुक्यात सापगांव, मुगांव, आटगांव सावरोली व डोळखांब या ठिकाणी आदिवासी महामंडळामार्फत भात खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. यापैकी डोळखांब व्यतिरिक्त सर्वत्र भात खरेदी सुरू करण्यात आली आहेत. मात्र डोळखांब येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सातबारा ऑनलाइन करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने या परिसरातील शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. याशिवाय दरवर्षी ज्या ठिकाणी महामंडळ मार्फत भात खरेदी सुरू करण्यात येत असे त्या चोंढे येथील गोडाऊनची प्रचंड दूरवस्था झाल्याने त्या ठिकाणी यावर्षी भात खरेदी करणे जिकरीचे बनले आहे. शासनाच्या या अनास्थेमुळे शेतकर्‍यांची प्रचंड ससेहोलपट होणार आहे. सातबारा ऑनलाइन करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असल्याने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली आहे.

सुभाष पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने ते डोळखांब येथे ऑनलाइन प्रक्रियेसाठी येऊ शकले नाही. दोन नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वावर गोडाऊन उपलब्ध होत नसल्याने डोळखांब परिसरातील भात खरेदी थांबली आहे.
– सागर सोनवणे, आदिवासी महामंडळ व्यवस्थापक