HomeठाणेShahapur : रेल्वे कर्मचार्‍यावर चोरट्यांचा जबर हल्ला

Shahapur : रेल्वे कर्मचार्‍यावर चोरट्यांचा जबर हल्ला

Subscribe

रेल्वे रुळालगत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या कर्मचार्‍याला खांद्यावर घेऊन राम लखन कुमार यांनी महामार्गावर आणले. त्यानंतर सरकारी वाहनातून खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल करून संबंधित घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली.

शहापूर । मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावर असलेल्या उंबरमाळी स्थानकाच्या रेल्वे रुळालगत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका रेल्वे कर्मचार्‍याचे प्राण वाचविण्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याला यश आले. उपनिरीक्षक राम लखन कुमार असे या अधिकार्‍याचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा बल विभागाचे उपनिरीक्षक राम लखन कुमार कसारा रेल्वे स्थानकात कार्यरत होते. त्या दरम्यान महिला आरक्षक स्वाती गोंडाणे यांना उंबरमाळी स्थानक परिसरात एक व्यक्ती
बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गोंडाणे यांनी उपनिरीक्षक राम लखन कुमार यांना कळविले.
तत्काळ कुमार यांनी क्षणाचा विलंब न लावता सरकारी वाहनाने घटनास्थळ गाठले. रेल्वे रुळालगत बेशुद्ध
अवस्थेत पडलेल्या कर्मचार्‍याला खांद्यावर घेऊन राम लखन कुमार यांनी महामार्गावर आणले. त्यानंतर सरकारी
वाहनातून खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल करून संबंधित घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी रुग्णालयात पोहचल्यानंतर संबंधित व्यक्तीची बॅग तपासली असता तो एक रेल्वे कर्मचारी आहे. त्याचे नाव सोमनाथ एकनाथ शिंदे राहणार इगतपुरी तालुका असे ओळख पत्रातून समोर आले.

रुग्णालयात उपचार केले जात असताना शुद्धीवर आलेल्या ३६ वर्षीय सोमनाथ शिंदे यांची विचारपूस केली असता, काम आटोपून ठाण्याहून लोकलने येत असताना उंबरमाळी स्थानकात उतरून घरी जाण्यासाठी नजिक असलेला मुंबई नाशिक महामार्ग गाठला. त्यावेळी चार अज्ञात लोकांनी मला मारहाण करत माझ्याजवळ असलेले २५ हजार हिसकावून घेतले. त्यानंतर रेल्वे रुळालगत फेकले. बेशुध्द अवस्थेत पडल्याने पुढचे काही आठवत नाही. असे सोमनाथ शिंदे याने पोलिसांना सांगितले. रेल्वे प्रवासात घडलेल्या या घटनेतून एका रेल्वे कर्मचारी प्रवाशाचे प्राण वाचल्याने आणि कसारा रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक राम लखन कुमार यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -