घरठाणेशरद पवार ही महाराष्ट्राची गरज- डाॅ.जितेंद्र आव्हाड

शरद पवार ही महाराष्ट्राची गरज- डाॅ.जितेंद्र आव्हाड

Subscribe

राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीसह सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

 शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्यात संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक,आर्थिक,  उद्योग,  राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , माजी मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, आव्हाड यांनी आज आपला राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा तर शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर,  युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह सबंध ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले आहेत.

लोका माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्याचे पडसाद सबंध राज्यभर उमटू लागले आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना डाॅ.जितेंद्र आव्हाड हे पुन्हा भावूक झाले. डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलेच पाहिजे.  कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे शरद पवार हेच आपणाला सांगत आले आहेत. आज कोणाचाही विचार न करता त्यांनी  राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे.  या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार! शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक चळवळीतील भीष्म पितामह आहेत. त्यांच्यातील ऊर्जा आम्हांस बळ देत आहे. माझा राजकीय प्रवास शरद पवार या नावाने चालू आहे. आमचे सर्वांचे जीवन पवारांशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच आम्ही आजही सांगत आहोत की, शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. त्यांना राजीनामा परत घ्यावाच लागेल, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान, यावेळेस आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. हे पदाधिकारी प्रचंड भावूक झाल्याचे दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -