ठाणे । शरद पवार यांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशिर्वाद पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी? डॉ. जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. याचे जितेंद्र आव्हाड यांनी आत्मपरीक्षण करावे, लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष दिला, चिन्ह दिले, जितेंद्र आव्हाड तुमचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही, असे मत राष्ट्रवादी अजित पवार, प्रदेश प्रवक्ते, ठाणे आणि पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळातून प्रतिक्रीया देताना म्हटले की, आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत. माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, सहमतीने 2014 साली विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता. याला काय म्हणायचे ? 2016 साली, 2018 साली, 2019 साली अनेक बैठका भाजपच्या नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमती आणि आशिर्वादाने या बैठका झाल्या होत्या याला काय म्हणायचे ? ज्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः शिवसेनेचे मुखपत्र जाळले, शिवसेनेविरूद्ध आंदोलने केली त्याच शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत 2019 मध्ये सामील झाले मग याला काय म्हणायचे? असे प्रश्न परांजपे यांनी उपस्थित केले.