घरठाणेठाण्यात उत्साहात शिवजयंती साजरी

ठाण्यात उत्साहात शिवजयंती साजरी

Subscribe

‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीताचे सादरीकरण

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पोवाडा.. नृत्य आणि ‘गीत जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सादरीकरणाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, परिवहन सभापती विलास जोशी यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गीतकार राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांच्या आवाजात अजरामर ठरलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र शासनाने राज्यगीतांचा दर्जा दिला. रविवारी शिवजयंतीच्या दिनी प्रारंभी सभागृहात या गीताचे सादरीकरण करण्यात आले. तद्नंतर ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. 64 च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडणारा पोवाडा सादर केला. तर शाळा क्र. 18 च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे गौरव गीत सादर केले. शिक्षिका सविता शिंदे व प्रेरणा कदम यांनी ‘म्यानातून उसळे तलवारीची पात’ हे गीत सादर केले.

मासुंदा तलाव व कळवा येथेही अभिवादन
मासुंदा तलाव येथील शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त प्रशांत रोडे, शंकर पाटोळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे कार्यालयीन अधीक्षक दत्ता गोंधळी उपस्थित होते. तसेच कळवा नाका येथील शिवरायाच्या प्रतिमेस उपायुक्त प्रशांत रोडे व सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

- Advertisement -

भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी चौक येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे उप-आयुक्त दिपक पुजारी, उप-आयुक्त दिपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोंगे, सहायक आयुक्त प्रीती गाडे सहा. आयुक्त सहा. आयुक्त नितीन पाटील, लेखा अधिकारी किरण तायडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी जगदिश जाधव, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा, संदिप पटनावर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) संदिप सोमाणी, कार्यकारी अभियंता (विद्युत) सुनिल पाटील, प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, फैजल तातली, सोमनाथ सोष्टे, बाळाराम जाधव, राजेंद्र वरळीकर, माध्यमिक विभाग प्रमुख निहाला मोमिन, निलेश संखे, स्नेहल पुन्यार्थी इतर विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी देखील पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहापुरात शिवजयंती उत्सव जल्लोषात
भगवे झेंडे, भगवे फेटे, भगवी उपरणी यामुळे तयार झालेले भगवामय वातावरण, जय भवानी जय शिवाजी च्या गगनभेदी घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा उलगडणारे पोवाडे अशा उत्साही आणि भगवामय वातावरणात शिवरायांवर साकारलेल्या चित्ररथांसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले आबालवृद्ध अशी भव्य मिरवणूक काढून शहापुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून शहापुरात शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी भव्य बाईक रॅली, दुसर्‍या दिवशी मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा (पाळणा) आणि रविवारी सकाळी दुग्धभिषेक व शिवजयंती मिरवणूक असा तीन दिवसीय व्यापक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्व समावेशक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष निलेश मांजे, कार्याध्यक्ष राजाराम डोंगरे, अनिल निचिते, जगदीश गवाळे व सचिन खिसमतराव यांच्या पुढाकाराने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

भाजपाच्या ठाण्यातील 17 मंडलांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 393 वा जन्मोत्सव ठाणे शहर भाजपातर्फे शहरातील 17 मंडलांकडून विविध स्तरावर शिवाजी साजरा करण्यात आली. या उत्सवासाठी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली.शिवप्रतिमेचे पूजन करुन मिरवणूक काढण्यात आली. महाशिवरात्रीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी मैदानात पार पडलेल्या होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रमात भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मंडल अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगभराबरोबरच ठाण्यात रविवारी जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवाजी महाराजांना अभिवादन
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ’गर्जा जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे गायन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन (नि.) प्रांजल जाधव, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, तहसीलदार राजाराम तवटे, राहुल सारंग, नगरपालिका प्रशासन अधीक्षक बी.जे. निपुर्ते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली.

कल्याणमधील वसतिगृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह , ठाणे , भिवंडी,कल्याण, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यामाने मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मोहासुर व्यसनमुक्ती संस्थेचे रघुनाथ देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाच्या विद्यार्थीनींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिक्षक वर्षा चव्हाण,रमेश पवार उपस्थित होते. वस्तीगृहाचे गृहपाल सातारले, कांबळे, गोननाडे, वैद्य यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -