केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप मध्ये युतीचे संकेत ?

bjp plan to take over transport chairman seat in kdmc

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा युती होते का ? याची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घटनांवरुन तसे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी झाली नसून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार अशी घोषणा शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा केली आहे. दुसरीकडे भाजप मनसेची युती होणार अशीही चर्चा शहरात रंगली आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता शहरात पुन्हा भाजप-सेना नेत्यांची दिलजमाई होताना दिसत आहे.

26 जानेवारी रोजी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या कार्यक्रमात पोहचले होते. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणाची प्रचंड चर्चा सुरु आहे. सोशल डिस्टसिंग ठेवा. मात्र मनात डिस्टन्स ठेवू नका असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेत्यांना केले होते. आता याला उत्तर देत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले. भाजप आमदार यांनी सांगितले की ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही तर विकास कामे होतील.शहर चांगले होऊ शकते. त्यामुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील जवळीक वाढत चालली आहे का, असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना-भाजप हे भले परस्पर विरोधी लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. गेल्या वर्षभरापासून चित्र बदललेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र येणार्‍या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कल्याण- डोंबिवलीत काँग्रेस राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तरीही राष्ट्रवादीकडून शिवसेनेला चुचकारल्याचे दिसून आलेले आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यांवरून शिवसेनेला टोला हाणला होता. याला शिवसेनेने कोणतेही उत्तर दिलेल नाही तर भाजपच्या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्स असले तरी मनातील डिस्टन्स वाढवू नका, असे सांगत आपल्यात दुरावा अद्याप झालेला नाही, हे दाखवून दिले. तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही तर विकास कामे होतील. शहर चांगले होऊ शकते. त्यामुळे येणार्‍या पालिका निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर युती होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.