घरठाणेठाण्यात स्थायी आणि परिवहन समितीवरही शिवसेनेचा भगवा

ठाण्यात स्थायी आणि परिवहन समितीवरही शिवसेनेचा भगवा

Subscribe

ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर आणि परिवहन समिती सभापती पदासाठी सेनेचे विलास जोशी या दोघांनी त्या – त्या सभापती पदासाठी बुधवारी अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या शिवाय कोणीही उमेदवारी अर्ज सादर न केल्याने त्या दोघांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र या बाबत अधिकृत घोषणा बाकी आहे. या दोन्ही समितींवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने ही आगामी ठामपा निवडणुकीची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक येत्या १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे. यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या सभापती पदासाठी तसेच परिवहन आणि पाच विशेष समिती सभापतीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये स्थायी समिती सभापतीसाठी संजय भोईर तर परिवहन समिती सभापतीसाठी विकास जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या दोघांच्याही विरोधात भाजपने आपले उमेदवार उभे न केल्याने या दोघांचीही निवड आता बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

पक्षीय बलाबल

ठाणे पालिकेत असेलल्या नगरसेवकांच्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीमध्ये १७ सदस्य आहेत. यामध्ये शिवसेना ८, राष्ट्रवादी ४, भाजप ३ आणि काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. गेल्यावर्षी मे २०१९ मध्ये झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेसच्या एका सदस्याने शिवसेनेला साथ दिल्यामुळे राम रेपाळे बिनविरोध निवडून आले. तर यंदा राज्यात बदललेल्या राजकीय समिकरणामुळे यंदाची स्थायी समिती सभापती पदासाठी रस्सीखेच होणार नसल्याची चर्चा होती. मात्र ठाण्यातही महाविकास आघाडीचेच चित्र निर्माण झाले असल्याने परिवहन आणि स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेने आपला झेंडा फडकवला आहे.

प्रभाग समित्यांवरही शिवसेनेचे वर्चस्व

महिलाराज गेल्या टर्मप्रमाणे या टर्ममध्ये देखील प्रभाग समिती सभापती पदांसाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या टर्ममध्ये नऊ प्रभाग समित्यांपैकी सात प्रभाग समित्यांवर महिला राज पाहायला मिळाले होते. यावेळी देखील नऊ प्रभाग समितींपैकी ८ प्रभाग समिती सभापती पदासाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून कळवा प्रभाग समिती सभापती पदासाठी वर्षा मोरे तर उथळसर प्रभाग समिती सभापतीसाठी वहिदा खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेकडून वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर,दिवा- सुनीता मुंडे,वर्तकनगर प्रभाग समितीसाठी राधिका फाटक,लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समितीसाठी आशा डोंगरे, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीसाठी नम्रता फाटक,तर माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती साठी भूषण भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंब्र्यात काँग्रेसच्या दीपाली भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -