हे फक्त ठाकरेच करू शकतात – सरनाईक

एक इंच अनधिकृत बांधकाम असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन

pratap sarnaik building waive penalty proposal in maha vikas aghadi government cabinet meeting

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सुडबुद्धीने विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड आणि व्याजही माफ करून आम्हाला न्याय दिला. हे फक्त ठाकरेच करू शकतात. असे बोलून जर विहंग गार्डनमध्ये एक इंच जरी अनधिकृत बांधकाम झाले असेल तर आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देईन, असेही स्पष्ट मत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच आपण इतर पक्षात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या असून आपण शिवसेना सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य सरकारने दंड आणि व्याज माफ केल्याबद्दल छाबैय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील रहिवाशांनी आणि आमदार सरनाईक यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आणि बॅन्ड वाजवून जल्लोषही साजरा केला. तसेच तिळगूळ देऊन तोंड गोड केले.

आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते, त्यावेळची होती. त्यानुसार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नदंकुमार जंत्रे यांनी विकासकांना बोलावून त्यानुसार आरक्षित भूखंड देताना तो विकसित करून दिल्यास त्याचा टीडीआर दिला जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार विहंग कंपनीने आरक्षित भूखंडावर शाळेचे बांधकाम करून दिले. परंतु तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी ती शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केली नाही व तांत्रिक दृष्टीने विहंग गार्डनचे बांधकाम बेकायदा ठरविले गेले. जितके चटई क्षेत्र मिळणार होते, तितकेच बांधकाम केले आहे. त्यामुळे इथे एक इंचही बेकायदा बांधकाम नाही. अशाचप्रकारे इतर विकासकांनी बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.

तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी झोपडपट्टी भागात राहणार्‍या दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी नोटिसा काढल्या होत्या. त्या विरोधात भूमिका घेतली. तसेच त्यावेळी राजीव यांनी केलेल्या भ्रष्टाचारही आपण बाहेर काढला होता. त्यामुळेच माझ्यावर सुडबुद्धीने जाताना फाईलवर ताशेरे ओढून कारवाई केली होती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यातही विहंग गार्डन ही इमारत उभारताना पालिकेने संपूर्ण मजल्यांसाठीच सीसी दिली होती. त्यानुसारच हे बांधकाम करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर वित्त विभागाने दंड माफ करू नये असे सांगितले असले तरी देखील त्यांच्याकडून नेहमीच असे निगेटिव्ह अभिप्राय येत असतात. परंतु अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो, त्यानुसार मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमय्या यांनी लेखी माफी मागावी
किरीट सोमय्या यांना दंडाची रक्कम किती हेच त्यांना माहीत नाही, त्यामुळे त्यांनी जे काही आरोप केले आहेत, त्याबाबत त्यांनी ३० दिवसात लेखी माफी मागावी अन्यथा न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही त्यांनी दिला.

लवकरच भाजपमधील कुंडल्या बाहेर येतील
ठाण्यातील भाजपच्या कोणत्या आमदाराने एसआरएमध्ये फ्लॅट घेतला, कोपरी तरण तलावाचे पाणी चोरी कोणी केली, कोणत्या नगरसेवक निधीतून त्याचे काम झाले, भाजपच्या कोणत्या माजी गटनेत्याने स्टेशन परिसरातील सायकल स्टँड ढापला याची सर्व कुंडली येत्या काही दिवसात बाहेर काढली जाणार असल्याचा इशाराच सरनाईक यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.

अभ्यास करून बोलावे
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा,असेही सरनाईक यांनी सांगितले होते. याबाबत शिवसेनेच्या जोरावर खासदार झालेल्या किरीट सोमय्या आणि भाजपवाल्यांनी आधी याचा अभ्यास करून बोलावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.