घरठाणेशिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी

शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी

Subscribe

गटनेते नजीब मुल्ला यांचे सेनेला आव्हान

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यावर चिखलफेक करतात म्हणून आगामी पालिका निवडणूकीत त्यांच्याशी आघाडी करू नये, अशी भूमिका शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. परंतु, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक एकतर्फी नाही. शिवसेनेचे पदाधिकारीसुध्दा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे महाआघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. शिवसेनेला आघाडी करण्यात स्वारस्य नसेल तर आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहोत. असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी हिंमत असेल तर शिवसेनेने येत्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी, असे म्हणून महापौरांना आव्हान दिले आहे.

खारेगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी कुणी पाठपुरावा केला आणि त्याचे श्रेय कुणाला या मुद्यावरून गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध पेटलेले आहे.
शिवसेनेला आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छा नसून आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करून अशी भूमिकाही महापौर नरेश म्हस्के आणि राम रेपाळे आदींनी मांडली आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला आगामी निवडणुकीत आघाडी करण्याची इच्छा नसेल तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. शिवसेनेच्या मागे आमचा पक्ष फरफटत जाणार नाही हे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवावे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार सतत वाढत आहे. त्यामुळे पुन्हा आपलीच सत्ता येईल या भ्रमात कुणी राहू नये असा इशाराही मुल्ला यांनी दिली आहे.

- Advertisement -

ठाण्यात आता सोशल वॉर सुरू
कळवा खारेगाव रेल्वे उड्डाणपुलावरून सुरू झालेला शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद आता सोशल मीडियावरही चांगलाच रंगू लागला. शिवसेनेने पहिला राष्ट्रवादीचा तर राष्ट्रवादीने आता शिवसेनेचा ‘विडिओ’ एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्यातच, आता महापौर नरेश म्हस्के यांनी एक फोटो ट्विट केले आहे. त्याच्यामध्ये महापौरांनी स्वतः हाती बॅट घेतलेली आहे. तसेच कॅप्शन करताना, मी आनंदाने चोपतो, नारायण.. नारायण.. म्हणून परांजपे यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
शनिवारी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात सुरू झालेला शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरू झाला होता. तो वाद रविवारी दिवसभर चांगलाच गाजला. त्यानंतर सोमवारी वाद शमेल अशी शक्यता वाट असताना, तो वाद शांत होण्याऐवजी तो आता सोशल मीडियावर रंगू लागला आहे. यामध्ये मात्र आता नेटकऱ्यांचे मनोरंजन होत आहे. व्हिडिओ करताना त्यामध्ये एडिट करून ते व्हायरल केले जात आहेत. त्याचपाठोपाठ फोटो ट्विट करून त्याच्यामध्ये आणखी रंग भरण्याचे काम जोरात सुरू आहे. हा वाद संपले की आणखी चिघळतोय हेच पाहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -