ठाण्यात शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची फेरीवाल्याकडून हत्या

शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी हे मंगळवारी रात्री जांभळी नाका येथील आपल्या घरी जात असताना, त्यांच्यावर काही फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. डोक्यावर हल्ला झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी ध्रुव पटवा आणू अशरफ अली या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. परदेशी यांचा जांभळी नाका येथे फेरीचा व्यवसाय होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा काही फेरीवाल्यांशी वाद सुरु होता.

हाच वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला त्यातून ते मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जात होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यावर जोरदार चॉपरसारख्या वस्तूने वार करण्यात आला. यामध्ये गंभीररित्या जखमी झाले. परदेशी यांना तातडीने ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी ध्रुव आणि अशरफ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.तसेच त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 1 चे उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.