ठाण्यात शिवस्वराज्य दिन साजरा; जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राजदंड स्वराज्यगुढी उभारली

Shivswarajya Day celebrations in Thane; Swarajyagudi was erected in the premises of Zilla Parishad
ठाण्यात शिवस्वराज्य दिन साजरा; जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राजदंड स्वराज्यगुढी उभारली

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पारंपारीक शिवकालीन तुतारीच्या निनादात, उत्साही, भारावलेल्या, मंगलमय वातावरणात, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ठाण्यात रविवारी ‘शिवस्वराज्य’दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यात आला.राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण ,भिवंडी, शहापूर या पंचायत समितीसह आणि सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. सर्वच स्तरावर हा कार्यक्रम करताना शासनाने कोविड१९ नियंत्रण करीता निर्गमित केलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती सांगताना कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेबाबतचा घडलेला प्रसंग सांगत महाराजांचा स्त्री विषयक असणारा दृष्टीकोन कथन केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान असून राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन असल्याचे सांगितले. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलांची चावी वाटप या कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रातिनिधिक स्वरूपात रोहिदास वाघे, परशुराम वाघे, परशुराम लभाडे, कुमुद तांडेल यांना घरकुलांची चावी प्रदान करण्यात आली.

ग्रामसंघाना ३ लाखांचा निधी वाटप

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हा राबविण्यात येणाऱ्या उमेद अभियाना अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या ग्रामसंघाना ३ लाख रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक डॉ.गंगाराम ढमके यांच्या पहाडी आवाजामध्ये शिवराज्याभिषेक पोवाडा, महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र) अजिंक्य पवार तसेच विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.