घरठाणेकुणी रद्दी देता का रद्दी...

कुणी रद्दी देता का रद्दी…

Subscribe

वर्तमानपत्रांच्या कमतरतेचा मोठा फटका द्राक्ष व्यवसायाला

लॉकडाऊनचा काळ हा सर्वांसाठी अतिशय भीषण होता. सर्वसामान्यांसह अनेकांना लॉकडाऊनची झळ सोसावी लागली आणि अजूनही लागत आहे. यात सर्वाधिक फटका वृत्तपत्रसृष्टीला बसलेला असून अनेक वृत्तपत्रे बंद झाली तर अनेक वृत्तपत्रातील पत्रकार कर्मचारी यांना कामावरून कमी करण्यात आलेले आहे. याची सर्वाधिक झळ द्राक्ष बागायतदारांना बसत आहे. वृत्तपत्राची रद्दी मिळत नसल्यामुळे नाशिक तसेच इतर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. द्राक्ष किंवा तत्सम फळे निर्यातीत टिकवण्याची गरज असते. त्यासाठी बॉक्स पॅकिंग करताना वृत्तपत्रांची रद्दी द्राक्ष घडातून सुटू नयेत, मोडू नयेत म्हणून वापरली जाते. लॉकडाऊनच्या काळात काही महिने वृत्तपत्रे छापली न गेल्यामुळे राज्यभर वृत्तपत्राच्या रद्दीची कमतरता जाणवू लागली आहे.

कोरोना या साथीच्या रोगामुळे देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे काही आठवडे वृत्तपत्रे बाजारात आली. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी वाचकांनी वृत्तपत्रांना स्पर्श देखील करणे बंद केल्यामुळे वृत्तपत्र मालकांना वितरकांकडून आलेली वृत्तपत्रे रद्दीत टाकावी लागली. त्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे विक्रेते देखील धोका पत्करत नव्हते. अखेर वृत्तपत्रे मालकांनी वृत्तपत्राची छपाई बंद करून डिजिटल अंक सुरू केला. हा डिजिटल अंक प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये पडू लागल्यामुळे वाचकांना देखील फुकट मिळणारे डिजिटल वृत्तपत्र अंक वाचायची सवय होऊन गेली, तरीही वृत्तपत्राचा व्यवसाय बंद होऊ नये म्हणून तसेच वृत्तपत्रांवर पोट असणार्‍यांच्या अडचणी होऊ नये म्हणून वृत्तपत्रे छपाईचा निर्णय घेण्यात आला आणि ऑगस्ट महिन्यात सर्वपरीने काळजी घेत वृत्तपत्रे छपाई होऊन बाहेर पडू लागले. मात्र, ग्राहक नसल्यामुळे वृत्तपत्राच्या कमी प्रती छापल्या जाऊ लागल्या, त्याचा परिणाम रद्दी व्यवसायावर झाला आहे.

- Advertisement -

द्राक्षांच्या या मोसमात रद्दीच्या तुटीचा सर्वाधिक परिणाम द्राक्ष बागायतदारांना जाणवू लागला आहे. वृत्तपत्राच्या रद्दीवर द्राक्ष बागायतदार अवलंबून असतात. निर्यात करण्यात येणारे द्राक्ष पॅकिंगसाठी इंग्रजी वृत्तपत्राच्या रद्दीला मोठी मागणी असते. द्राक्ष खराब होऊ नयेत, सूर्यप्रकाशापासून द्राक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी द्राक्ष बागायतदार वृत्तपत्र रद्दीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रत्येक वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात राज्यातून अडीच ते तीन लाख टन द्राक्षाची निर्यात होते. त्यापैकी ७५ टक्के द्राक्ष नाशिक जिल्हा आणि २५ टक्के द्राक्ष पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून निर्यात होतात. द्राक्षांच्या पॅकिंगसाठी एका एकरीमागे ३००किलो रद्दी बागायतदाराना लागते. गेल्यावर्षी या रद्दीचा भाव किलोमागे १५ ते १८ रुपये होता. या वर्षी मात्र रद्दी भाव दुप्पट झाला असून चांगल्या रद्दीचा सध्याचा भाव ३८ ते ४० रुपये किलोपर्यंत जाऊन पाहोचला आहे. राज्यातील वृत्तपत्राच्या रद्दीचा उणीवा भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील रद्दी व्यावसायिकाकडून गुजरात, मध्य प्रदेश,बंगळुरु या राज्यातून वृत्तपत्राची रद्दी मोठ्या प्रमाणात मागवली जाऊ लागली आहे.

द्राक्षांसाठी 25 हजार टन रद्दीची गरज
निर्यात होणार्‍या द्राक्षांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी साधारण २५ हजार टन इतक्या रद्दीची आवश्यकता असते. यंदा लॉकडाऊनमुळे रद्दीची उपलब्धता कमी झाल्यामुळे तुटवडा कमालीचा वाढला आहे. यामुळे यावर्षी रद्दीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांना वृत्तपत्रांची रद्दी मिळत नसल्यामुळे मोठमोठे बागायतदार वर्तमानपत्रांच्या कचेरीबरोबरच छपाई होणार्‍या छापखान्यात येरझार्‍या घालू लागले आहेत.

- Advertisement -

इंग्रजी रद्दीला अधिक मागणी
राज्यभरातील द्राक्ष बागायतदारांची गेल्यावर्षी ७५ हजार एकर प्लॉटची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी ७५ टक्के प्लॉट हे एकट्या नाशिक जिल्ह्यातील असून इतर २५ टक्के पश्चिम महाराष्ट्रातील आहे. प्रत्येकी एकर मागे द्राक्ष पॅकिंगसाठी साधारण ३०० किलो रद्दी लागते. उच्च दर्जाच्या कागदाचा वापर आणि त्यावरील शाई न फुटण्याच्या कारणास्तव इंग्रजी वर्तमानपत्रांच्या रद्दीला सर्वाधिक मागणी असते. द्राक्षांना शाई लागून द्राक्ष खराब होण्याची शक्यता असल्यामुळे इतर भाषांहून इंग्रजी वृत्तपत्रांच्या रद्दीला अधिक मागणी असते, असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतचे द्राक्ष बागायतदार गणेश बानकर यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

…तर रद्दीचे भाव गगनाला भिडतील
द्राक्ष बागायतदारांमुळे नाशिक जिल्ह्यात अनेक रद्दी व्यावसायिक असून त्यापैकी एक असणारे प्रवीण उर्फ पप्पूशेठ गांगुर्डे हे पिंपळगावचे रद्दी व्यावसायिक द्राक्ष बागायतदारांना ७००ते ८०० टन रद्दी विकतात. मात्र, यावर्षी ही मागणी पूर्ण करता येत नसल्याचे गांगुर्डे यांनी स्पष्ट केले. द्राक्ष पिकाचा हंगाम आता कुठे सुरु झाला आहे. हा हंगाम फेब्रुवारीपर्यंत सुरू असतो. जर वृत्तपत्राच्या रद्दीची हीच अवस्था असेल तर परिस्थिती अवघड बनेल, असे त्यांनी म्हटले. या तुटीमुळे यावर्षी रद्दीचा दर ६० ते ७० रुपये किलोच्या घरात जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -