ज्यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची, त्या घरातील लोकांचा आधी विश्वास संपादन करुन घ्यायची. कालांतराने नोकरी सोडून द्यायची त्यानंतर त्याच घरात डल्ला मारायची. मात्र इमारतीतील सीसीटीव्हीमुळे तिची चोरी लपू शकली नाही. अखेर सिमा उर्फ नेहा ढोलम हिला डोंबिवली पालिसांनी अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला. तसेच तिच्याकडून चोरी केलेले लाखोचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले. डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आजी आजोबा राहतात. दोघे संपन्न कुटुंब आहे. त्यांच्या घरात 2022 ते 2023 दरम्यान एक महिला आली. तिने घर काम करण्यासाठी नोकरी मागितली. बोलण्यावरून चांगली असल्याने आजी आजोबांनी तिला कामावर ठेवले. एक वर्षानंतर त्यांच्यात वाद झाले. वादानंतर ती महिला नोकरी सोडून गेली. एके दिवशी निदर्शनास आले की, घरातील दागिने चोरी झालेले आहेत. त्यामुळे आजी आजोबा हैराण झाले होते. घरी बाहेरचे कोणी येत नव्हते. ती मोलकरीण महिला पण नोकरी सोडून गेली होती. मग चोरी कोणी व कधी केली ? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर याबाबतची तक्रार डोंबिवली पोलिस ठाण्यात करण्यात आली.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, पोलिस कर्मचारी विशाल वाघ, पोलिस कर्मचारी कुरणे, पोलिस कर्मचारी सरनाई, सांगळे यांच्या पथकाने पोलिस तपास सुरु केला. आजी आजोबा राहत असलेल्या इमारतीमधील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्याठिकाणी एक महिला सुरक्षा रक्षकाशी बोलताना दिसून आली. ती महिला दुसरी कोणी नसून पूर्वीची मोलकरीण सीमा ढोलम होती. आजी आजोबांकडून काम सोडले होते तरी ती त्या इमारतीत कशाला आली होती? याबाबत पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अखेर या महिलेस शोधून अटक केली. त्यावेळी पोलीस चौकशीत जे सत्य समोर आले ते धक्कादायक आहे. सीमा आजी आजोबांच्या घरातील नोकरी सोडून गेली खरी, मात्र तिने नोकरी सोडण्यापूर्वी घराची नकली चावी तयार केली होती. आजी आजोबा दोघेही घरी नसताना ती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला फोन करायची. सुरक्षा रक्षकाला वाटायचे ती आजी आजोबाची आस्थेने चौकशी करीत आहे. त्यामुळे तो आजी आजोबा घरी आहेत कि नाही ते सांगायचा. आजी आजोबा घरी नाहीत,याची खात्री सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून केल्यानंतर ती घरी येऊन चोरी करुन जायची. पोलिस अधिकारी योगेश सानप यांनी सांगितले की, तिने या आधी अशाच प्रकारे दोन घरात चोरी केलेली आहे. ती डोंबिवली तिच्या भाच्यासोबत राहते. तिचे पती गावी आजारी आहेत. त्यांच्या उपचारासाठी तिला पैसे लागायचे. तसेच तिला दागिन्याची भारी हौस होती. त्यामुळेच ती चोरी करीत होती. तिच्याकडून पोलिसांनी 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.