एसआयटीने आणखी पाच जणांना केली अटक

बनावट बांधकाम परवानगी घोटाळा प्रकरण

डोंबिवली : कल्याम डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासह बनावट बांधकाम परवानगी तयार करुन बेकायदा इमारतीसाठी रेरा प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने आतापर्यंत केवळ पाच मध्यस्थांना अटक केली. मात्र त्यानंतर एकाही बिल्डरला अटक केलेली नव्हती .त्यामुळे या प्रकरणात एसआयटीचा तपास मंदावल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच बुधवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

केडीएमसीच्या बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करणाऱ्या ६५ बिल्डरांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रकल्पांचे प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकरण वास्तू विशारद संदीप पाटील यांनी सर्वप्रथम उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणी थेट मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने केडीएमसीने चौकशी करून त्या ६५  बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला.  एसआयटीने तपास सुरु करून ६५ पैकी ४० बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची कारवाई केली. तसेच याप्रकरणात बनावट कागदपत्र तयार करून देण्यात व मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणाऱ्या ५ जणांना अटक देखील केल्याने बिल्डर्स मंडळींचे धाबे दणाणले होते.

कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करून तपास करण्याची कारवाई केली गतीने केली जाते .मात्र याप्रकरणात आतापर्यंत एकाही बिल्डरला अटक झालेली नव्हती .त्यामुळे एसआयटीचा तपास मंदावला असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र बुधवारी एसआयटीने आणखी पाच जणांना अटक केली.त्यामध्ये मुकुंद मिलिंद दातार,सुनील बाळाराम मढवी, आशू लक्ष्मण मुंगेश, रजत राजन व राजेश रघुनाथ पाटील यांचा समावेश आहे.मात्र अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बिल्डर वा जमीन मालक किंवा बनावट बांधकाम परवानगी बनवून देणारे आहेत का ? याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.