कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर व लवंग पावडर तयार करण्यासाठी व लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा ठाणे अन्न व औषध विभागाने (एफडीए)तुर्भे एमआयडीसी येथील मे. रिषी कोल्ड स्टोरेज येथे कारवाई करत जप्त केला आहे. १ लाख ६० हजार १११ किलो जप्त केलेल्या साठ्याची किंमत दोन कोटी २४ लाख १५ हजार ५४० इतकी असल्याची माहिती एफडीए ने दिली. अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली असता तेथून हा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला साठा मे. जी. टी. इंडिया प्रा. ली., शॉप नं. बी-५१, एपीएमसी मार्केट, वाशी या आस्थापनेचा असल्याचे उघडकीस आले. हा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या साठ्यातून एकूण ०७ लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी विभागाचा कार्यभार घेताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगाने कडक कारवाई घेण्याचे आदेश नुकतेच दिलेले होते. त्यानुसार प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार खडके, राहुल ताकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.