मुंबई, ठाणे जिल्ह्यात पोलिसांच्या वेशात फिरुन पादचार्यांना लुटणार्या एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी मंगळवारी दुपारी मुंबई पोलिस दलातील डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे पथक आंबिवलीतील इराणी वस्तीत आले होते. यावेळी स्थानिकांनी अटक आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सोडविताना पोलीस आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. यावेळी आंबिवलीत काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फिरोझ फय्याज खान असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात एकूण 35 गुन्हे केले आहेत. या भागातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलीस असल्याची बतावणी करुन तो पादचार्यांना लुटायचा. काही दिवसापूर्वी अंधेरी येथील किशन बसवराज (21) या तरुणाला आरोपी फिरोझ आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलीस असल्याचे सांगून त्याच्या जवळील एक लाख रुपये लुटले होते. किशन नोकरदार आहे. डी. एन. नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी अंधेरीत घटना घडलेल्या आझाद नगर मेट्रो स्थानका जवळील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात आरोपी हा ठाणे, मुंबई भागात भुरट्या चोर्या करणारा सराईत गु्न्हेगार असल्याचे समजले. तो आंबिवलीतील इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डी. एन. नगर पोलिसांनी इराणी वस्तीवर पाळत ठेऊन फिरोझला पकडण्यासाठी गुप्त सापळा लावला होता. फिरोझ मंगळवारी दुपारी दाढी करण्यासाठी घराबाहेर पडणार आहे. अशी गुप्त माहिती खबर्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी न्हाव्याच्या दुकाना बाहेर पाळत ठेवली होती. तो दुकानात येऊन बसताच. मंगळवारी दुपारी पोलीस विद्यार्थीवाहू ओमनी व्हॅन, टपाल वाहू वाहनासारखे दिसणारी लाल मोटार घेऊन इराणी वस्तीत घुसले. यावेळी आरोपी आपल्या साथीदारांसह एका न्हाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी बसला होता. पोलिसांनी दुकानाला चारही बाजुने घेरले. आरोपी फिरोझला पकडून वाहनात जबरीने बसविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांना हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. फिरोझला पकडताच त्याच्या दुकानाबाहेरील साथीदारांनी पोलीस वाहने, पोलिसांवर दगडफेक केली. एक पोलीस अधिकार्याच्या डोक्याला दगडाचा फटका बसला आहे.
पोलीस वाहने इराणी वस्तीमधून बाहेर पडत असताना स्थानिक रहिवाशांनी फिरोझला सोडविण्यासाठी हातात दगड घेऊन वाहनांचा रेल्वे फाटकापर्यंत पाठलाग केला. परंतु, पोलीस सुसाट वेगाने वाहने घेऊन वस्ती बाहेर पडले. पोलीस वाहनांवर दगडफेक करणार्या इसमांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, यापूर्वी अशाप्रकारचे हल्ले या वस्तीत पोलिसांवर अनेकदा झाले आहेत. मुंबई पोलीस या ठिकाणी अनेकदा इराणी गुन्हेगारांना पकडण्यासाठी इराणी वसाहतीमध्ये येत असून स्थानिक पोलिसांना मात्र कोणतीही माहिती न देता या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहेत. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड स्थानिकांनी केली. याप्रकरणी अद्याप तक्रार देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कोणीही आले नाही.