घरठाणेठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी अनुभवले नेहरू तारांगण

ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी अनुभवले नेहरू तारांगण

Subscribe

आकाशगंगेचा प्रवास, ग्रह तार्‍यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील 500 विद्यार्थ्यांनी एक दिवस विज्ञान सैर केली. भरपूर प्रश्न विचारून, शंका समाधान करून घेऊन, विज्ञानाची, ग्रह-तार्‍यांची नवीन चित्रे मनात साठवत हे विद्यार्थी घरी परतले. ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी यासाठी ‘विज्ञानमंच’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या उपक्रमात महापालिका शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, गेल्या आठवड्यात (शुक्रवार, 03 नोव्हेंबर) महापालिकेच्या विविध शाळांतील 500 विद्यार्थ्यांनी मुंबईतील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र व नेहरू तारांगण येथे भेट दिली. ठाणे परिवहन सेवेच्या नऊ बसेसमधून हे विद्यार्थी वरळी येथे गेले होते.

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण येथे ब्रम्हांडाचे रहस्य उलगडून दाखवणारा ‘वैश्विक जीवन’ हा खेळ पाहिला. त्यावेळी, नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे आणि मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर, दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहरू सायन्स सेंटर येथे ‘सायन्स ओडिसी’ हा विशेष खेळ पाहिला. थ्री डी आणि एसओएस हे खेळही पाहिले. विज्ञान केंद्रातील सायन्स गॅलरीमध्ये मनसोक्त भ्रमंती केली. तिथे त्यांना विविध गमतींद्वारे विज्ञानाचे सिद्धांत, नियम, संकल्पना यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या दोन्ही ठिकाणच्या भेटीमुळे विद्यार्थी अतिशय खूश होते. त्यांना नवीन गोष्टी जाणून घेता आल्या. अनेक गोष्टींबाबत त्यांना कुतूहल असल्याचे जाणवत होते, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण करणे, निरिक्षण शक्ती वाढवणे आणि भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी पायाभरणी करणे हे विज्ञानमंच या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि विज्ञान सहली यांचे आयोजन केले जात आहे, असेही सोमण म्हणाले.

- Advertisement -

नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्राच्या भेटीदरम्यान मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रा. नामदेव मांडगे, महेन्द्र केळकर, विनायक रानडे, हेमंत काणे, निलिमा ठाकूर आणि कुंदा कारभारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, प्रेरणा कदम, अरुंधती डोमाळे, संतोष दळवी, निलिमा पाटील, स्नेहल वैद्य, गीता तांबट, ललिता सारंगा, सुनील साळुंखे, उमाकांत कुडे या शिक्षकांनी बसप्रमुख म्हणून नियोजन केल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) उमाकांत गायकवाड यांनी दिली. विद्यार्थ्यांना या भेटीमुळे नवनवीन गोष्टी जाणून घेता आल्या. भविष्यात आणखी विद्यार्थ्याना वेगवेगळ्या विज्ञान केंद्रांना नेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -