सूर्यनारायण आग ओततोय, शुक्रवारचा पारा ४२.२ अंश सेल्सिअस

climate change, low angle view Thermometer on blue sky with sun shining in summer show increase temperature, concept global warming

हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला असताना, तो अंदाज तंतोतंत जुळताना दिसत आहे. गेल्या सहा दिवसात ठाणे शहरात तापमानाचा पारा हा ३९ ते ४२ अंश सेल्सिअसच्या घरात घुटमळताना पाहण्यास मिळत आहे. यामुळे सूर्य नारायण जणू आगच ओततोय असा भास होत आहे. शुक्रवारी तापमानाचा पारा हा ४२.२ अंश सेल्सिअस झाले होते. फेब्रुवारी महिन्यात अंगाची लाहीलाही होत असून काही दिवसांवर होळी आल्याने यंदा ठाण्यात तापमानाची विक्रमी नोंद होण्याची भीती ही वर्तवली जाऊ लागली आहे. गतवर्षी म्हणजे २०२२ मध्ये होळीच्या दुसऱ्याच १७ ( मार्चला ) दिवशी ठाणे शहराचे तापमान ४५.६ अंश सेल्सिअसने वधारले होते. त्यातच हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च २०२२ या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा ३५ अंशाच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास ४० अंशाच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून येत आहे.

यंदा मात्र, फेब्रुवारी २०२३ च्या १९ आणि २३ या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्या कालावधीत तापमानाचा पारा १९ फेब्रुवारीला ४१.९ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पुन्हा तापमानाचा पारा हा ४१.८ अंशावर गेला होता. त्यातच पुन्हा एकदा शुक्रवारी २४ फेब्रुवारीपासून पुढे चार दिवस हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला असताना, पहिल्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीला तापमानाचा पारा ४२.२ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला आहे. उर्वरित दिवसात आणि आगामी होळीनंतर हे तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा गतवर्षाच्या जवळपास महिन्यापूर्वी उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवल्याने आगामी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात हे तापमान असेच राहिल्यास जीव नकोसा होईल, अशी भीती ही ठाणेकर नागरिकांकडून वर्तवली जाऊ लागली आहे.
ठाणेकरांनी असे केले पसंत
ठाणेकर नागरिकांनी हा वाढता उकाडा नकोसा झाला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत नसल्याने आणि अंगाला चटके लागत असल्याने ऑफिस आणि घरात पंख्या खाली किंवा एसीमध्ये बसणे नागरिकांकडून पसंत केल्याचे पाहण्यास मिळत आहे.

ठाण्याचे असे होते तापमान
तारीख        तापमान
19 फेब्रुवारी  41.9
20 फेब्रुवारी   39.4
21 फेब्रुवारी   39.3
22  फेब्रुवारी  38.4
23  फेब्रुवारी   41.8
24 फेब्रुवारी    42.2