शहापूरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू; वनविभाग मात्र गाफील

दोन दिवस बिबट्या विहीरीतच पडून, वनविभागाला थांगपत्ता नाही वन्यप्राणी प्रेमींमध्ये संताप 

वासिंद जवळील वांद्रे खोर जवळील घाटाळ पाडा येथील एका बोडक्या विहीरीत पडून एका नर जातीच्या तीन वर्ष आयुर्मान असलेल्या बिबट्याचा पाण्यात गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा येथे उघडकीस आली आहे.तब्बल चार दिवस अगोदरच बिबट्या विहिरीत पडून मृत पावलेला असतानाही याचा साधा थांगपत्ता ही शहापूर प्रादेशिक विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांना नसल्याने वन्यप्राणी प्रेमींमध्ये एकच संताप व्यक्त होत आहे.गुरुवारी सकाळी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.असे शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी माहिती देतांना सांगितले.

पिवळी वांद्रे गावा वस्तीजवळ लागून शहापूर प्रादेशिक विभागाचं दाट असं घनदाट जंगल आहे.याच ठिकाणी घाटाळ पाडा लगत एक जुनी कठडे नसलेली बोडकी विहीर आहे.या विहीरी जवळ गुरुवारी प्रचंड दुर्गंधी सुटल्याने काही तरी विहीरीत मरुन पडले असावे असा अंदाज स्थानिक गावकऱ्यांना आला काही ग्रामस्थांनी विहीरीत डोकावून पाहिले असता एक बिबट्या मरुन पडल्याचे आढळून आले सदर बिबट्या सडलेल्या अवस्थेत होता तथापि बिबट्याचा मृत्यू हा चार दिवसांपूर्वी झाला असवा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.दरम्यान या बिबट्याच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेबाबत स्थानिक दहागाव वन परीमंडळाचे वनपाल व शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना साधी माहिती मिळू शकलेली नाही आपल्या कामात मशगुल असलेल्या वनविभागाला या घटनेबाबत मागमूसही नव्हता याबाबत मोठं आश्चर्य व्यक्त होत असून वनविभागाचे कमालीचे दुर्लक्ष व बेफिकिरी या घटनेनंतर समोर येत आहे.

वेळीच स्थानिक वनपाल व वनरक्षक यांना विहिरीतील बिबट्याची माहिती मिळाली असता तर विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित विहिरी बाहेर काढून त्याचा जीव वाचविता आला असता मात्र वन कर्मचारी विहिरीकडे फिरकलेच नाहीत असे वन्यप्राणी संघटनांचे म्हणणे आहे.दरम्यान बिबटयाचा मृत्यू हा विहिरीत पडून झाला आहे की ? शिकारी टोळ्यांनी बिबटयाच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी त्याला लक्ष केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.कारण बिबट्याची नखं,पंजे आणी मुच,दात गायब असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी गावकऱ्यांनी सांगितले आहे. तथापि बिबटयाचा मृत्यू हा संशयास्पद वाटत आहे. तथापि घटनेची माहिती मिळताच शहापूर प्रादेशिक वन विभागाने बिबटयाचा मृतदेह ताब्यात घेतला असून गुरुवारी बिबटयाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.एकिकडे जंगलात दुर्मिळ होत असलेल्या बिबटयांची आकडेवारी पाहता विहिरीत पडून बिबटयाचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेने वन्यप्राणी प्रेमींमध्ये मात्र एकच हळहळ व्यक्त होत आहे.

सदर मृत बिबटयाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर बिबटयाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. तसेच मृत बिबटयाची नखं, दात, पंजे गायब नाहीत.
– शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी : प्रकाश चौधरी 
जंगलातील बहुतांश वन्यप्राण्यांची संख्या कमालीची रोडावत चालली असताना एका बिबटयाचा विहीरीत पडून मृत्यू होण्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी अशी आहे.
-पर्यावरण वादी सामाजिक संस्था शहापूर : रविंद्र गोतारणे

बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहरमामा भोसलेंवर गुन्हा दाखल