अंबरनाथमधून ठाकरे शिवसेना हद्दपार

शिंदे शिवसेनेचे वर्चस्व कायम

shinde grourp and thakre group

अंबरनाथ शहरातील ठाकरे शिवसेना मधील शहर प्रमुखांपासून युवा सेना विद्यार्थी सेना महिला आघाडी समवेत शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गट अंबरनाथ मधून जवळपास हद्दपार झाला आहे. या शिवाय शहर शाखा ठाकरे गटाच्या ताब्यात असतांना ठाकरे गटाच्या सैनिकांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे शहर शाखेतून काढून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावल्याने शिंदे शिवसेनेचा वर्चस्व कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. अंबरनाथ शहर शिवसेनेचा गड समजला जात होता. गेली अनेक दशके अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती. येथील शिवसेनेवर पूर्वी पासून एकनाथ शिंदे यांची पकड होती. त्यांचा दबदबा होता. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सर्व प्रथम अंबरनाथ मधून आमदार डॉ बालाजी किणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी उपन्गराध्यक्ष अब्दुल शेख सुभाष साळूंखे समवेत शेकडो शिवसैनिकांची साथ मिळाली होती.

दुसरीकडे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी काही दिवस तटस्थ भूमिका घेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपले नेते आहेत असे जाहीर करून दोन गटाच्या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र पडद्यामागे दबावतंत्रच्या घडामोडी ने वैतागून वाळेकर आणि त्यांच्या कुटूंबियानी शिंदे गटात प्रवेश घेऊन ठाकरे गटाला रामराम केला. वाळेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. परंतु त्यांचे खास समर्थकांना ठाकरे गटातच थांबून शहर शाखा ताब्यात ठेवत ठाकरे गटाचे अस्तित्वही कायम ठेवले होते. मागच्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे शिवसैनिक आमदार समवेत शिंदे गटाच्या पदाधिकर्‍यांच्या विरोधात सक्रिय झाल्याने दोन्ही गटात जबरदस्त तणाव निर्माण झाला होता. अखेर आगामी निवडणुका आणि शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल पाहता या दोन्ही गटातील वाद संपुष्टात आणण्यासाठी रविवारी रात्री स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. आपापसातील वाद मिटवत पक्ष संघटन मजबूत करत पक्ष वाढीसाठी काम करण्याचे आदेश वजा सज्जड दम दिल्याची माहिती हाती आली आहे. वर्षा बंगल्यावरच्या घडामोडींनंतर रविवारी संध्याकाळी अरविंद वाळेकर यांनी ठाकरे गटातील त्यांचे निकटवर्तीय शहर प्रमुख श्रीनिवास वालमीकी, महिला संघटक समवेत इतर पदाधिकार्यां सोबत बैठक घेऊन त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या.

शेवटी ठाकरे गटाच्या पदाधिकारींनी अंबरनाथ शहर शाखेतून उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर रात्री उशिरा अंबरनाथ येथे शिव मंदिर आर्ट फेस्टिवल निमित्त पाहणीसाठी आलेले खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या सर्व पदाधिकार्यांनी भेट घेऊन शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. ठाकरे गटाचे उरले सुरले पदाधिकारीही शिवसेनेत गेल्याने अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.