ठाणे । ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे २०२४ मध्ये एकूण ३९७७ तक्रारींची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी या आग तसेच झाडे यांच्याबद्दलच्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांनी केलेल्या बचाव आणि मदत कार्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान टाळण्यात विभागाला यश मिळाले. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रार आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीचे मदत आणि बचाव कार्य केलेच. शिवाय, अतिरिक्त मदतीची आवश्यकता भासल्यास अग्निशमन दल, वृक्ष प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसेच पोलीस यांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेचा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सदैव मदत आणि बचाव कार्यासाठी तत्पर असतो. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनात ठाणे महापालिकेचा सर्व विभागांशी तसेच, इतर यंत्रणांशी समन्वय साधून तत्काळ निर्णय घेतले जातात. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य जलद आणि प्रभावी करणे शक्य होते, असेही तडवी यांनी सांगितले.
उल्लेखनीय बचाव कार्ये
डिसेंबर २०२४ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथे ट्रेकिंगसाठी गेलेले १० तरूण मधमाशा चावल्याने, भीतीमुळे तेथेच अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली. डिसेंबर २०२४मध्ये कॉसमॉस रेसिडन्सीमधील दोन वयस्कर व्यक्ती आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यांच्या सहकार्याने जलद कारवाई करून पाच ते १० मिनिटांत त्या दोन्ही व्यक्तींना वाचवण्यात यश मिळाले. ऑक्टोबर २०२४मध्ये वागळे इस्टेटमध्ये कंपनीला आग लागली. आगीचे भयंकर स्वरुप लक्षात घेऊन इतर महापालिकांकडूनही तत्काळ अतिरिक्त मदत मागवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सप्टेंबर २०२४मध्ये देव कॉपोरा येथील ११व्या मजल्यावर लागलेल्या आगीतून १० नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली.
तक्रारींचे स्वरुप – संख्या
आगी संबंधित – ८१५
झाड पडणे – ६७५
झाडाची फांदी पडणे – ४८४
झाड धोकादायक स्थितीत असणे – १६८
स्लॅब पडणे – ०४
पाण्याची गळती – २१३
पाणी साचणे – ६५
गॅस गळती – ३८
घर पडणे -०३
इमारतीचा भाग पडणे -०३
इमारत धोकादायक स्थिती असणे -०२
संरक्षण भिंत पडणे -२१
नाल्याची भिंत पडणे – ०६
गच्ची/गॅलरी पडणे – ०५
जमीन खचणे – दरड कोसळणे – ०५
लोखंडी शेड पडणे – १६
बनावट फोन कॉल – ०२
मॉक ड्रील – रंगीत तालीम – २९
मृतदेहासंबंधी – ४२
प्लास्टर पडणे – १७
रस्त्यावर ऑईल सांडणे – १९०
इतर तक्रारी – ११७४
एकूण – ३९७७