ठाणे भूषण डॉ.मधुसूदन खांबेटे यांचे ९२ व्या वर्षी निधन

लघु उद्योगाचे भीष्म पितामह म्हणून ओळख

टिसा व कोसिआचे संस्थापक,अध्यक्ष मधुसूदन उर्फ आप्पासाहेब खांबेटे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी शुक्रवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन नातवंडे, नात सुना, जावई असा परिवार आहे. त्यांची पार्थिव उद्या म्हणजे शनिवारी टीसा हाऊस रोड नं. १६ वागळे इस्टेट येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तर ते लघु उद्योगांचे मार्गदर्शक तसेच भीष्म पितामह म्हणून ही परिचित आहेत.कोसिआच्या माध्यमातून चीन व सेनेगल येथे उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व देखील त्यांनी केले. तसेच त्यांना ठाणे महापालिकेने ठाणे भूषण पुरस्कार देत, सन्मानित करण्यात आले.

डॉ. खांबेटे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले या गावात स्वांतत्र्यापूर्वी झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच ते कोलकता येथे गेले. त्यानंतर त्यांचे सुरवातीचे शिक्षण गुजराती माध्यमाच्या शाळेत झाले. १९३८ ते १९४२ दरम्यान त्यांचे शिक्षण झाले. त्यामुळे त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी व गुजराती देखील येत होती. १९४८ मध्ये स्वांतत्र्यानंतर नागपुरात त्यांनी मॅट्रीक पूर्ण केले. त्यानंतर ते मुंबईला आले व पुढील इंटरमीडीएट सायन्स र्पयत शिक्षण पूर्ण केले. ते केवळ एक खेळाडूच नव्हते तर त्यांनी आपल्या शाळेच्या हॉकी, फुटबॉल आणि खो – खो संघाचे नेतृत्व देखील केले होते. दरम्यान त्यांनी पुढील एरोनॉटील इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी कोलकत्ता येथे जाणार होते. परंतु, सरकारने एरलाईन उद्योग ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुढे कोर्सला पुढे जाण्यात अर्थ नसल्याचे सांगितले.

त्याचवेळेस त्यांना मे. वेस्टींगहाऊस सॅक्सबी अॅंड फार्मरमध्ये ब्रेक मिळाला. त्यावेळेस शिक्षण आणि काम त्यांनी एकत्रच सुरु केले. त्यानंतर ते इंग्लडला सुध्दा गेले. मात्र त्यांच्यातील खरा उद्योजक हा कोलकत्ता येथे घडला. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह ठाण्यात स्थायीक झाले. त्यानंतर त्यांनी रेल्वेला काही सुटय़ा भागांचा पुरवठा आणि देखभाल करण्याचे काम चालू ठेवले. याच काळात त्यांनी वागळे इस्टेट भागात दिड लाख व १५ हजार उसनवार घेऊन ५०० चौरस मीटरचा भुखंड खरेदी केला. याठिकाणी वडीलांच्या नावाने त्यांनी कंपनी सुरु केली.

ते स्वत: या कंपनीत १६ ते १८ तास राबत होते. लघु उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी १९७४ साली टिसाची स्थापना केली. त्यानंतर जानेवारी २०२२ पर्यंत ते या संस्थेचे अध्यक्ष होते. जिल्ह्यात लुघ उद्योग वाढविण्याबरोबर रोजगार निर्मितासाठी तसेच ठाण्याच्या विकासासाठी टीसाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अथवा महाराष्ट्रातील उद्योगासाठी काम करतांना लघु उद्योगांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावरील अडचणी येत होत्या. यातूनच चेम्बर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन (कोसिआ) ची स्थापना झाली त्याचेही अध्यक्ष होते. २०१४ मध्ये त्यांनी पिअरलेसेसचा अॅटक येऊन गेला. मात्र अवघ्या सहा महिन्याते ते पुन्हा जीना चढू उतरु लागले होते. परंतु काही दिवसांपूर्वी ते घरात पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. तेव्हापासून ते आजारी असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

लघुउद्योजकांचा नंदादीप विझला
“`टीसा’चे आधारस्तंभ आप्पासाहेब खांबेटे यांच्या निधनाने लघुउद्योजकांचा नंदादीप विझला. वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीतील लघुउद्योजकांचे प्रश्न मांडण्यासाठी ते अखंड कार्यरत होते. त्यांच्या निधनाने उद्योग व सामाजिक चळवळीतील एक तळमळीचे सच्चे व्यक्तिमत्व हरपले. त्यांचे संपूर्ण जीवन हे आदर्श प्रेरणावत होते.”
– निरंजन डावखरे, आमदार, भाजपा

पितृतुल्य व्यक्तीमत्व हरवले
“डॉ. खांबेटे यांचे निधन हि खरोखरच धक्कादायक बातमी. त्यांची ओळख म्हणजे ठाणे येथील टिसा या संस्थेच्या माध्यमातून उद्योग सेवा हेच सर्वस्व. आशावाद ठेवणारे व तळमळीने लघु उद्योगांना मदत करणारे पितृतुल्य व्यक्तीमत्व हरवले. खरोखर एका मार्गदर्शकाला आम्ही उद्योजक मुकलो आहोत.”
-प्रदीप पेशकार, प्रदेश अध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी.