जिल्ह्यातील ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट ठाणे शहर

54 पैकी ३६ रुग्ण ठाण्यातच शहरांना ओमायक्रॉनचा बसतोय वेढा

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'

महाराष्ट्रात पहिला ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळून आला होता. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात सापडलेल्या एकूण ५४ रूग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण हे ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचे हॉटस्पॉट तूर्तास तरी ‘ठाणे शहर’ असल्याचे बोलले जात आहे. तसेच ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि उल्हासनगर या शहरात हे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील शहर भागांवर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट असलेला ओमायक्रॉनचा वेढा हळूहळू आवळला जाताना दिसत आहे.

मागील एक ते दीड महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रोन या नव्या व्हेरिएंटने ठाणे जिल्ह्यात देखील हळूहळू आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ओमायक्रोन या आजाराचा पहिला रुग्ण देखील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या शहरात आढळून आला होता. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या बाबत जिल्हा प्रशासनाने देखील गंभीर दखल घेत, परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास देखील सुरुवात केली होती.

मागील महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात परदेशवारी करून २६ हजार ६३२ नागरिक परतले आहेत. त्यापैकी १६ हजार २११ नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. तर १२ हजार ८७५ जणांची अद्यापही कोरोना आजाराबाबतची चाचणी करण्यात आली आहे.

चाचणी केलेल्या नागरिकांपैकी १२५ जणांचे नमुने डब्ल्यूजीएस या चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ५४ जणांचा अहवाल हा ओमायक्रॉन सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.  या आजाराचे सर्वाधिक ३६ रुग्ण हे एकट्या ठाणे महापलिकाक्षेत्रात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे ठाणे पालिका प्रश्नाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढला असून पालिका प्रशासन देखील अधिक सतर्क झाली आहे. याचदरम्यान महापालिकेने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती देण्यासाठी एक नंबर आणि ईमेल तयार केलेला आहे. त्याच्यावर सोसायट्यांना माहिती देण्याचेही आवाहन केले आहे. त्यातच, दुसरीकडे नवी मुंबईमध्ये ८ तर, कल्याण डोंबिवलीत  ७ रुग्ण आणि उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहे. सुदैवाने या रुग्णांना सौम्य किंवा काहींना लक्षणेही नसल्याचे दिसत आहे. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात आहे. अहवाल येण्यास उशीर होत असल्याने बहुतांशी रुग्ण हे उपचार घेऊन घरी ही जात आहेत.