मजुरी दिली नाही म्हणून कंत्राटदाराच्या डोक्यात घातला लोखंडी पाना!

murder file photo
प्रातिनिधिक छायाचित्र

लॉकडाऊनच्या काळात काम केलेली मजुरी देत नसल्याच्या रागातून कंत्राटदाराच्या डोक्यात पाईप घट्ट करण्याच्या लोखंडी पान्याने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सुकूर रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मजुराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून काही तासातच आरोपीला अटक केली आहे. विजयराम उदगीर सरोज (३८) असे हत्या करण्यात आलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. ठाण्यातील मोघरपाडा येथे राहणार विजयराम हा मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील आहे. विजयराम हा प्लम्बिंगचे कंत्राट घेत असे. त्यांच्याकडे मदतनीस म्हणून त्याच्यागावाजवळील दूरचा नातेवाईक सुरज पन्नालाल सरोज (२३) याला मजुरीवर ठेवले होते. ठाण्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होताच विजयराम याने काम सुरु केले होते आणि सूरजला देखील कामावर बोलावून घेतले होते. विजयराम याचे ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या सुकुर रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स येथे प्लम्बिंचे काम सुरु होते.

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये विजयरामने सूरजला मजुरी दिलेली नव्हती. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुकुर रेसिडेन्सी कॉम्प्लेक्सच्या गेटवर सुरजने काम केल्याची १२ हजार रुपयाची मजुरी विजयरामकडे मागितली. अगोदरचे पैसे दिल्यानंतरच आज कामावर येईल असे सुरजने विजयरामला सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्या भरात सुरजने पाण्याच्या पाईप घट्ट करण्यासाठी वापरणारा लोखंडी पाना पिशवीतून बाहेर काढून विजयरामच्या डोक्यात दोन ते तीन वेळा मारला. विजयराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच सुरजने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विजयरामला उपचारासाठी रुग्णलायत आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी सूरज सरोज याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा कसून शोध घेऊन काही तासात त्याला ठाण्यातूनच अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.