घरक्राइमहुक्का पार्लरला माफी नाही; घोडबंदरला पोलिसांची कारवाई

हुक्का पार्लरला माफी नाही; घोडबंदरला पोलिसांची कारवाई

Subscribe

 

ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले असतानाच अशा पार्लरवर अचानक धाडी टाकण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज सज्ज झाली आहे.

- Advertisement -

गेल्या दीड-दोन वर्षांपासून आमदार संजय केळकर यांनी तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांना वारंवार तक्रारी केल्या, तर अधिवेशनातही आवाज उठवला. परिणामी शहरातील विशेषत: घोडबंदर पट्ट्यातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई सुरू झाली आहे. चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिनेवंडर मॉलमधील द मिंट, हिरानंदानी मेडोजमध्ये लाउंज १८, कोठारी कंपाऊंडमधील द सेक्रेड आणि ऑसर हॉस्पिटलशेजारील हँग आऊट क्लब येथे वारंवार अचानक धाडी टाकण्यात येऊन त्याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी आमदार संजय केळकर यांना लेखी दिली आहे.

या आस्थापनांवर २०२२ मध्ये आठ गुन्हे आणि २०२३ मध्ये चार गुन्हे दाखल केले आहेत. यातील चार गुन्हे तपासाधीन असून चार प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. ठाण्यात हुक्का पार्लरला परवानगीच नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फास्ट ट्रॅकवर ही प्रकरणे चालवावीत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांचाही पाठिंबा या चळवळीला वाढू लागला असल्याची माहिती केळकर यांनी दिली.

- Advertisement -

ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असून येथील तरुणांची पिढी उद्ध्वस्त करण्याचे पातक बेकायदेशीर हुक्का पार्लर चालकांकडून होत आहे. या विरोधात आमदार केळकर यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांची फौज सज्ज झाली आहे. ही फौज बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या हुक्का पार्लरवर अचानक धाडी टाकणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -