ठाणे । शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना म्हणणार्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे गड राखण्यात या विधानसभा निवडणुकीत मोठे यश आले आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा -माजिवडा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पाडण्याकरता मोठी चुरस विरोधकांकडून सुरू होती. पण अखेर ठाणे गड राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले. ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार संजय केळकर विजयी झाले आहेत, एक लाख मतांची आघाडी मिळवत ते विजयी झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत सुरू होती, मनसेचे अविनाश जाधव , शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राजन विचारे आणि भाजपचे संजय केळकर यांच्यामध्ये तिरंगी लढत सुरू होती. परंतु या तिरंगी लढतीमध्ये संजय केळकर यांना तिसर्यांदा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त झाला आहे.
तर कोपरी- पाचपाखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा 1 लाख 20 हजार 717 मतांनी विजयी झाले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून उमेदवारी देण्यात आली होती, परंतु एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातून मोठा मताधिक्याने एकनाथ शिंदे पुन्हा एकदा निवडून आले आणि केदार दिघे यांचा पराभव झाला. तसेच ओवळा – माजिवडा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे एक लाख मतांनी आघाडी करत विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नरेश मनेरा तर मनसेचे संदीप पाचंगे हे उभे होते, परंतु या मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांनी केलेले काम यामुळे पुन्हा एकदा मतदाराने त्यांना मतदान करून निवडून दिले आहे.
149 कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे 96 हजार 228 मतांनी विजयी झाले आहेत, या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजितदादा गटाचे) नजीम मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली होती.परंतु जितेंद्र आव्हाड हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तसेच त्यांनी केलेले काम पाहता या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना मते देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. यामुळे जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनसेने देखील या विधानसभा क्षेत्रात सुशांत सूर्यराव यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा पराभव झाला.