ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये लागलेल्या आगीवर अखेर तीन तासांनी नियंत्रण; ७ गाळे जळून खाक

स्फोटाचा आवाजाने नागरिक भयभीत, प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे साहित्याला आग

thane fire wagle estate godown thane 7 shops burned in huge fire after three hours fire control
ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये लागलेल्या आगीवर अखेर तीन तासांनी नियंत्रण; ७ गाळे जळून खाक

ठाणे: वागळे इस्टेट,अंबिका नगर २,या ठिकाणच्या रोड नंबर २९ मध्ये प्लॉट नंबर ए-२०२ या इंडस्ट्रियल परिसरातील एकापाठोपाठ तब्बल सात गाळ्यांना आग लागल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजून ९ मिनिटांच्या सुमारास समोर आली. आगीत त्या गाळ्यांमधील एलपीजी गॅस सिलिंडराचा अचानक चार ते पाच वेळा आवाज आला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. मात्र नेमके किती सिलिंडरचा स्फोट झाला हे समजू शकले नाही.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना अंदाजे तीन तासात यश आले. आग ज्या गाळ्यांमध्ये लागली, त्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये वापरण्यात येणारे सामान, लोखंडी साहित्य, फायर फायटिंगचे साहित्य, पुठ्ठाचे बॉक्स इत्यादी साहित्य होते. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

याचदरम्यान राज्याचे नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून त्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच भयभीत स्थानिक नागरिकांना धीर दिला. तसेच अग्निशमन दलाच्या तत्परतेचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपस्थित होते.

वागळे इस्टेट या परिसरात आग लागली असून गॅस सिलिंडरचा एका पाठोपाठ एक मोठमोठे आवाज येत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण,वागळे पोलीस,आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

त्यातच त्या एका गाळ्यांपाठोपाठ ही सात गाळ्यांपर्यंत ही आग पोहोचली. त्यातच त्या गाळ्यांमध्ये प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे सामान, लोखंडी साहित्य, फायर फायटिंगचे साहित्य, पुठ्ठाचे बॉक्स इत्यादी साहित्य होते. त्यामुळे आगीचा भडक होत होता. त्यातच तेथे असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होत असल्याने आग आणखी भडकली. तसेच मोठमोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

त्यातच या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यातच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने नागरिक आणखी भयभीत झाले. तर मोठयाने स्फोटाचा आवाज होत असून आतापर्यंत चार ते पाच सिलिंडर स्फोटाचे आवाज कानावर आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

तर घटनास्थळी १-जेसीबी मशिन व १- बाईक रुग्णवाहिका, २-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहन, २-जम्बो वॉटर टॅंकर, ३-वॉटर टँकर पाचारण केले होते. या आगीत अक्षय कदम यांच्या मालकीचे गाळा नंबर ६,७ तर ८, ९ या दोन गाळ्यांचे मालक राजेश मैथु हे असून १० नंबरचा गाळा अविनाश पूत्रन, ११ नंबरचा गाळा रिशी बन्सल तर गाळा नंबर ३ हा सातारे यांचा मालकाचा असून त्या सात गाळ्यांचे नुकसान झाले आहे.

ही आग नेमकी कशी लागली. तसेच यावेळी नेमक्या किती सिलिंडरचा स्फोट झाला हे अद्यापही समजू शकले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.