ठाणे । ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी म्हस्के यांनी यावेळी निवेदन दिले. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत सोमवारी १६ डिसेंबर रोजी संसदेत जल वाहतुकीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी क्षेत्रांना (एमएमआर) अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे जोडण्याची योजना आखली आहे. ही प्रणाली सुरुवातीला भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेटी बांधून मीरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली यांना जोडेल.
प्रवासी जलवाहतूक पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी सुरुवातीला वसई खाडी – उल्हास नदीवर चालविली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ‘एमएमआर’मधील नागरिकांना सुलभ प्रवासाचा लाभ मिळून वेळेचीही बचत होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ९६.१२ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात चार जेटींचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे, ज्याचा खर्च सागरमाला योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारे समान प्रमाणात करतील. लोकांमध्ये अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकप्रिय करण्याची गरज आहे. परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी संथगतीने होत आहे. ही सुविधा तयार झाल्यानंतर, राज्य सरकारला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी ऑपरेटर यांची आवश्यकता लागेल. मांडवा दरम्यान रो-पॅक्स सेवा तसेच त्याच मार्गावरील पारंपारिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत आहेत. त्याच धर्तीवर येथेही या सुविधा सुरू केल्यास त्या लोकप्रिय होतील, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
राष्ट्रीय जलमार्ग ५३ वर आणखी जेटी बांधण्याची योजना असली तरी, त्या नंतर बांधल्या जातील आणि वसई, कल्याण, पारसिक, नागलाबंदर, अंजूर दिवे आणि घोडबंदर गायमुख सारख्या भागात सेवा देतील. गायमुख, घोडबंदर येथे एक जेट्टी आधीपासूनच कार्यरत आहे आणि फ्लोट चालविण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. हे प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.