ठाणे जिल्ह्यातील आमदार-खासदार कोरोना पॉझिटिव्ह

पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनाही लागण

corona

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे आणि ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक हे दोघेही कोरोनाबाधित झाले आहेत. खासदार विचारे यांच्यावर घरीच आणि आमदार सरनाईक यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. एकाच दिवशी तिघे पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहर हादरले आहे.

सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या समवेत विचारे हे देखील न्हावा-शेवा येथे पाहणी दौर्‍यासाठी गेले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी पालकमंत्री शिंदे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यावर विचारे यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

नवीन वर्षात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात 4 जानेवारीपर्यंत 10 पोलीस अधिकारी व 26 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्त व 5 अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक त्यांचे स्वीय सहाय्यकही कोरोनाबाधित झाले आहेत.