घरठाणेकोपरीतील 'त्या' दोन शौचालयांच्या कंत्राटदारांवर कारवाईचे आयुक्तांचे पहिल्याच दौऱ्यात आदेश

कोपरीतील ‘त्या’ दोन शौचालयांच्या कंत्राटदारांवर कारवाईचे आयुक्तांचे पहिल्याच दौऱ्यात आदेश

Subscribe

शौचालयांची स्वच्छता आणि कचरा साठू न देणे यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश

ठाणे: चेंदणी कोळीवा्ड्यातील वस्ती स्वच्छता गृह, तसेच विसर्जन घाट येथील सार्वजनिक शौचालय यांची देखरेख व स्वच्छता करण्यासाठी कोणीही उपस्थित नसणे, नळांना गळती लागून पाणी वाया जाणे, शौचकूपातील अस्वच्छता याबद्दल या दोन्ही शौचालयांच्या कंत्राटदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी दिले. हे आदेश चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी पांचपाखाडीत पहिल्याच दौऱ्यात दिले आहेत. त्यामुळे चुकीला माफी नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांचा आढावा बांगर यांनी घेतला. त्यानंतर, बुधवारी कोपरी ते आनंदनगर परिसरात प्रथमच त्यांनी दौरा केला. चेंदणी काेळीवाडा, हरियाली तलाव, अष्टविनायक चौक हा भाग त्यांनी पायी फिरून पाहिला. तसेच, कोपरी-मिठबंदर विसर्जन घाट, सॅटीस पुलाचे काम, कचऱ्यातून सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रहालय, कोपरी स्मशानभूमी, राम मराठे उद्यान, सिध्दार्थ नगर परिसर, कपडा मार्केट, ठाणे पूर्व स्टेशन परिसर, आनंदनगर प्रवेशद्वार, सेवा रस्ता, तीन हात नाका ते नितीन कंपनी येथेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक प्रकल्प, स्वच्छता, रस्त्याचा कडेला असलेला कचरा आदींबद्दल त्यांनी नौपाडा परिमंडळाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सूचना केल्या.

- Advertisement -

कोळी वाडा वस्ती स्वच्छतागृहातील पाण्याची गळती, शौचकूप आणि व्हरांड्यातील अस्वच्छता, तसेच देखभाल करण्यासाठी कोणीच हजर नसणे, याबद्दल आयुक्त बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हाच प्रकार, कोपरी-मीठबंदर विसर्जन घाटापाशी असलेल्या स्वच्छतागृहातही होता. या दोन्ही स्वच्छतागृहांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. आपल्या शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची कोणतीही समस्या असेल तर ती प्राधान्याने दूर करावी. नागरिकांची गैरसोय अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी ताकीद आयुक्तांनी दिली.

स्मशानभूमीतील कामे
कोपरी येथील स्मशानभूमीची पाहणी आयुक्तांनी केली. तेथीस नागरी सुविधांबद्दल त्यांनी सूचना केल्या. तसेच, या परिसरातील अर्धवट बांधकामेही पाहली.

- Advertisement -

उद्यानाची पुर्नरचना
आनंदनगर जकात नाका ते नितीन कंपनी जंक्शन येथील कामांची पाहणी आयुक्तांनी केली. त्यातील जेथे अजून उद्यानाचे काम झालेले नाही तेथे स्थानिक, आकर्षक झाडे लावण्यात यावीत. त्याची पुर्नरचना केली जावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

सॅटीसच्या कामाचे नियोजन
ठाणे पूर्व येथील सॅटीस पुलाची बांगर यांनी दोन्ही दिशांनी पाहणी केली. कामाची सद्यस्थिती जाणून घेतल्यावर त्यांनी या कामाचे महिनावार नियोजन सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुलाशेजारील नाल्यात साठलेला कचरा पाहून त्यांनी असमाधान व्यक्त केले. सॅटीससाठी सिद्धार्थ नगर येथे ठाणे महापालिकेने हटवलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. तेथेच फुटपाथवर साठवण्यात आलेले कपड्यांचे गठ्ठे तत्काळ उचलण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले.

हरियाली तलावाबद्दल समाधान
हरियाली तलावातील पाणी, परिसरातील स्वच्छता याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, तलावाच्या पाण्यावर कचरा राहू नये यासाठी वेळोवेळी स्वच्छता केली जावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

निर्माल्य कलशांची दुरावस्था
हरियाली तलाव आणि कोपरी विसर्जन घाट येथील निर्माल्य कलशांची दुरावस्था पाहिल्यावर निर्माल्य कलशांतील निर्माल्य उचलले जाण्यासोबतच त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

*…तेवढा गतीरोधक द्या!

आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात, कोपरीतील पराग सोसायटी आणि राम मराठे उद्यान येथे असताना एका ज्येष्ठ महिलेने थांबून एक समस्याही कानावर घातली. त्या म्हणाल्या या भागात मोठ्या संख्येने बाईकस्वार अत्यंत वेगात जातात. परिसरातील लहान मुले उद्यानात खेळण्यास येतात. त्यांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे तेवढा गतीरोधक तातडीने द्यावा. आयुक्तांनी या सूचनेची आवश्यकता पडताळून पुढील कारवाई विनाविलंब करण्याचे आदेश दिले.

गडद रंग, सुबक चित्रे आणि शुद्धलेखन
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कोळीवाडा वस्ती परिसरातील महिलांसाठी असलेली व्यायामाची उपकरणे आणि गप्पांचा कट्टा याची देखभाल सूयोग्य पद्धतीने करण्याची सूचना आयुक्तांनी केली. शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने उन, वारा, पाऊस या कशानेही फिके पडणार नाहीत, असे रंग वापरावेत. म्हणजे तो परिसर उठून दिसेल.. तसेच, चित्रे काढताना ती सुबक, कलात्मक असतील, हे आवर्जून पहावे, असे सांगताना आयुक्तांनी महिलेच्या डोक्यावर थेट मासा ठेवलेले चित्र वास्तववादी वाटत नाही. टोपलीत मासे घेऊन जात आहे,असेच तिथे असायला हवे, अशी सूचना त्यांनी केली.

“शौचालय स्वच्छता हा सर्व नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे किंवा अमलबजावणीतील चूकांमुळे शौचालय अस्वच्छ असतील, तर नागरिकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागतो. सदर बाब स्वीकाहार्ह नसून याबाबत कारवाई करण्याची वेळ न पाहता तत्परतेने दुरुस्ती होईल, याची दक्षता घ्यावी.”- अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महानगरपालिका.


नोटाबंदी कोणत्या कायद्याअंतर्गत केली? सुप्रीम कोर्टाची केंद्रासह RBI ला नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -