होमक्वारंटाईन रुग्णांवर पालिकेचे लक्ष

रोजच्या रोज औषधोपचार, तब्बेतीची चौकशी

गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या इतकी झपाट्याने वाढू लागली आहे. दुदैवाने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अवघे ८ टक्के इतके आहे. उर्वरित जवळपास ९२ टक्के रुग्ण हे गृह विलीनीकरणात आहे. या रुग्णांना कोणता त्रास होतोय का ? त्यांना कोणत्या स्वरूपाच्या औषधाची गरज आहे. या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची विचारणा महापालिकेच्या कॉल सेंटर द्वारे करून रुग्णांना निगराणीखाली ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका हद्दीत १ लाख ६५ हजार ४४७ कोरोना बाधीत झालेले आहेत. त्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार २४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २ हजार १११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा कालावधी हा ८६ टक्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा ५२ दिवसांवर आला आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेत रोजच्या रोज २ ते सव्वा दोन हजाराहून अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. परंतु आतापर्यंत नव्याने आढळून येत असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार होत असल्याचे दिसून आले आहे. फक्त ८ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान १ ते ११ जानेवारी या कालावधी गृहविलीगकरणात ५ हजार ८०३ रुग्ण असून त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे.

यासाठी पालिकेचा कॉल सेंटर विभाग सज्ज करण्यात आला आहे. याठिकाणी चार तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केलेली असून इतर मदतनिसांच्या माध्यमातून घरी उपचार घेत असलेल्या रुग्णाची माहिती रोजच्या रोज घेतली जात आहे. त्याची प्रकृत्ती कशी आहे, त्याला कोणता त्रास होत आहे का, त्याच्या संपर्कातील इतरांना कोणता त्रास आहे का ? त्या अनुषंगाने त्यांना घरपोच औषधे देखील पोहचविली जात आहेत. त्यासाठी देखील पालिकेच्या आरोग्य विभागाची पथके कार्यरत आहेत. याचदरम्यान काही रुग्ण एका सोशल मीडिया ग्रुपवर डॉक्टरांकडून सल्लामसलत करत आहेत. तसेच डॉक्टरांशी बोलता येईल का असेही विचारत आहे. त्याचबरोबर घरी उपचार घेणारे घराबाहेर पडत नाहीत ना याच्यावर ही लक्ष्य ठेवले जात असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.