परिवहनचा 620 कोटी 90 लाखांचा अर्थसंकल्प सादर

महापालिकेकडे 460 कोटींच्या अनुदानाची मागणी, बस तिकिटात वाढ नाही

ठाणे महानगरपालिका फोटो

ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पाचे उत्पन्न आणि खर्चाचे मूळ अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी ठामपा परिवहन समिती सभापती विलास मोरे यांच्याकडे सादर केले. 2021-22 सुधारित अंदाजपत्रक महसुली आणि भांडवली खर्चासह 272 कोटी 91 लक्ष असून 2022-23 महसुली व भांडवली खर्चासह 620 कोटी 90 लाखांचा सादर करण्यात आले आहे.

यामध्ये 81 बसेससह गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या नवीन योजनेनुसार 200 बसेस प्रस्तावित केल्या असून तीन बस डेपोमध्ये स्वतःचे सीएनजी पंप सुरू करणार असल्याचे स्पष्ट करून पुन्हा एकदा महापालिकेकडे 460 कोटी अनुदानाची मागणी केली आहे. तसेच उत्पन्न वाढीसाठी बस फेर्‍या वाढीबरोबर परिवहन जागेत एटीएम सेंटरची उभारणी, परिवहन सेवेच्या जागांवर होर्डींग्जला परवानगी, चौक्यांवर जाहीरातीचे हक्क आदी उत्पन्नाचे स्रोत यामध्ये नमूद केले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी देखील परिवहनच्या तिकीट दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

कोरोनाच्या काळात परिवहनला दिवसाला 3 ते 5 लाखांचेच उत्पन्न मिळत होते. परंतु आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर परिवहनला रोजच्या रोज 20 ते 22 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. परंतु मधल्या काळात म्हणजेच कोरोनापूर्वी परिवहनला 25 ते 27 लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यानुसार आजही उत्पन्न कमीच असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे परिवहनच्या बसेसमधून दीड लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत आहेत. तर परिवहनचे उत्पन्न जरी 22 लाखांच्या घरात असले तरी परिवहनचा रोजचा खर्च हा सुमारे 35 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे परिवहनला रोजच्या रोज 15 लाखांच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे.