घरठाणेठामपाच्या 170 कर्मचार्‍यांच्या बदल्या

ठामपाच्या 170 कर्मचार्‍यांच्या बदल्या

Subscribe

- अतिक्रमण विभागातील सर्वाधिक 85 कर्मचारी

ठाणे महापालिकेत नोकरी लागल्यानंतर वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी जहागिरी निर्माण करणार्‍या किंवा करू पाहणार्‍या महापालिकेच्या 9 प्रभाग समितीमधील तब्बल 170 कर्मचार्‍यांच्या बदल्या फतवा प्रशासनाने काढला आहे. यामध्ये सर्वाधिक 85 कर्मचारी हे अतिक्रमण विभागातील असल्याने वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे या बदल्या झाल्याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. तर बदल्यांचा फतव्यामध्ये प्रामुख्याने बिगारी, सफाई कामगार, लिपीक, करवसुली विभाग, बिट निरीक्षक, मुकादम, शिपाई आदींचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांवरून लोकप्रतिनिधींकडून महापालिका प्रशासनावर वारंवार टीका होत आहे. त्यातच अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह काही समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदल्या बदल्या झाल्या होत्या. याचदरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांवर प्राणघातक हल्लाही झाला. त्यामध्ये त्यांना आपली बोटे गमवावी लागली. यावेळी त्यांनी हा हल्ला अनधिकृत बांधकामावरून झाल्याचा आरोपही केला होता. त्यावेळी झालेली महासभा अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर चांगली गाजली होती.

- Advertisement -

याचदरम्यान एका महासभेत दोन वर्षांत ज्या सहाय्यक आयुक्तांच्या काळात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यांच्या कारवाई करण्याबाबत एक ठराव करण्यात आला. त्याला अनुसरूनच आजी-माजी सहाय्यक आयुक्तांना नोटिसा बजावल्या आहेत. हे होत नाही तोच महापालिका प्रशासनाने नऊ प्रभाग समितीत आपली जहागिरी निर्माण करणार्‍या तब्बल 170 कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

याचदरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कर्मचार्‍यांपासून अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे अधिकार आपल्याकडे घेतल्याने या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांची ऑर्डर काढलेल्या कर्मचार्‍यांना सोमवारपासून आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. जे कर्मचारी बदल्या केलेल्या ठिकाणी हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई देखील प्रस्तावित केली आहे. त्याशिवाय हजर न राहिल्यास त्यांची सेवा विना वेतन धरण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -