घर ठाणे ठाणे महापालिका प्रभाग क्र. 3 मधील शौचालयांची दुरावस्था

ठाणे महापालिका प्रभाग क्र. 3 मधील शौचालयांची दुरावस्था

Subscribe
माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मधील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेसाठी गेल्या एक-दीड वर्षापासून कंत्राटदार न नेमणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधानांनी काही वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उघड्यावर शौच न करणे व शौचमुक्त भारत हे होते. परंतु ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे ठाणे महापालिका प्रभाग क्र. 3 मधील सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या नागरिकांना उघड्यावर शौचालयाला बसण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक शौचालयांची पार दुरवस्था झाली असून परिसरातील शौचालय स्वच्छतेसाठी गेल्या एक-दीड वर्षापासून कंत्राटदारच नेमले नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारामधून उघडकीस आली आहे.
प्रभाग क्र. 3 मधील आझादनगर, मानपाडा, मनोरमानगर येथील शौचालयाच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या कंत्राटदाराची माहिती मागितली असता गट क्र. 6, गट क्र. 7, गट क्र. 8 तसेच गट क्र. 10 ची शौचालयाची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत 2021 रोजी आणि गट क्र. 9 व गट क्र.11 च्या कंत्राटदाराची मुदत 2022 रोजी संपल्याची माहिती माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरिक्षकांनी दिली आहे. अशाप्रकारे स्वच्छतेसाठी कंत्राटदार न नेमता स्वच्छ सर्वेक्षणाच्या लाखो रुपयांच्या जाहिराती करुन, स्वच्छतेचे आव आणून ठाणेकरांची दिशाभूल केली जात आहे. शौचालय स्वच्छतेसाठी कंत्राटदार नसल्याने आजुबाजूला दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालय स्वच्छ नसल्याने साथीचे रोग पसरून आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ठाणे महानगरपालिका अतिशय उदासीन असल्याचे सदर प्रकारातून लक्षात येते. असे प्रकार करुन ठा.म.पा. अधिकारी मुख्यमंत्र्यांना मुद्दाम अडचणीत आणू पहात आहेत का? असा प्रश्न पडतो.
ठाणे शहरासारख्या स्मार्ट सिटीमध्ये गेली दीड वर्षे शौचालय स्वच्छतेसाठी कंत्राटदार न नेमणे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. तरी येथील शौचालय स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमण्यास पुढाकार घ्यावा व असे प्रकार घडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर  फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष मोरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी शहर संघटक प्रमोद पत्ताडे, रोहित गायकवाड, मंगेश गायकवाड इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -