घरठाणेशिळ आणि कौसा येथे सापडले गोवरचे बाधित रुग्ण

शिळ आणि कौसा येथे सापडले गोवरचे बाधित रुग्ण

Subscribe

गोवरशी लढण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा येथे विलगिकरण कक्ष सुरू

शिळ आणि कौसा या नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत गोवर या आजाराचे बाधित सापडले आहेत. त्यामुळे, या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या हद्दीत २४ तास आणि सातही दिवस घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात, कौसा येथे ५, शीळ येथे ४, मुंब्रा येथे २, एन एम गल्लीत २ असे गोवर बाधित सापडले आहेत. गोवरची लक्षणे दिसू लागल्यापासून तो बरा होईपर्यंत दहा दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे, शिळ आणि कौसा आरोग्य केंद्रात पाच दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून, दुसरी फेरी लगेच पुढील पाच दिवसात पूर्ण करावी. जेणेकरून सर्व संशयित बालके शोधून उपचार करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अजूनही ज्या बालकांनी लस घेतली नसेल त्यांचे पालकांनी त्यांना लसीकरण करून घ्यावे. लस घेतलेल्या बालकांना गोवर होत नाही. अपवादाने झालाच तर कोणत्याही धोक्याशिवाय बालक बरे होते. म्हणून लसीकरण आवश्यक असल्याचा पुनरुच्चार आयुक्त बांगर यांनी केला.

खाजगी डॉक्टरांना आवाहन
स्थानिक भागात काम करणारे सर्व खाजगी डॉक्टर आणि नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांचा नंबर नोंदवून तो तत्काळ व्हॉट्सॲप ग्रुपवर देणे बंधनकारक आहे. याच ग्रूपवर उपचार, औषधे याबद्दल मार्गदर्शन केले जाईल, असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

- Advertisement -

विलगीकरण कक्ष
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास पार्किंग प्लाझा येथेही विलगीकरण कक्ष तयार आहे. तसेच, तेथे बालकांसाठी अती दक्षता कक्ष ही उपलब्ध आहे.

गतिमान लसीकरण
लसीकरण वाढवणे, फिरते लसीकरण पथक तैनात करणे, ठाणे महापालिका क्षेत्रातील अंगणवाड्या, बालवाड्या येथील मुलांचे गोवर आणि रुबेला लसीकरण गतिमान करणे आदी विषयांवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडेही बैठक झाली. त्यास उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य केंद्रांच्या समन्वयक डॉ. राणी शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

खाटा, औषधे यांची कमतरता नाही
खाटा, औषधोपचार यांची कोणतीही कमतरता भासणार याची काळजी घेतली जात आहे. सर्वेक्षणाचे काम २४ तास आणि सातही दिवस सुरू राहील. त्यात खंड पडणार नाही.

लसीकरणाला विरोध नको
नागरिकांनी लसीकरणाला विरोध करणे घातक आहे. काही नागरिक जर बालकांनी लस घेण्यास विरोध करत असतील तर ते प्राणघातक ठरू शकते. याची जाणीव करून देण्यासाठी दररोज शीळ आणि कौसा या दोन आरोग्य केंद्रांच्या हद्दीत चौक सभा घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याने आजार आणि लसीकरण याबद्दल जागरूकता वाढेल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बालकांचे गोवर लसीकरण झाले नसेल तर ते तत्काळ करून घ्यावे. लसीकरणाची व्यवस्था सर्व नागरी आरोग्य केंद्रे, छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे सुरू आहे. तसेच, “गोवरची लक्षणे आढळली तर ताबडतोब आरोग्य केंद्रात या. उपचारांनी गोवर बरा होतो. मात्र त्यात विलंब झाला तर धोक्याचे ठरू शकते.”
-अभिजीत बांगर,आयुक्त, ठाणे महानगरपालिका

गोवरची लक्षणे
ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.
नागरिकांना गोवरसदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी घरगुती उपाय करण्यात वेळ न घालविता तात्काळ ठाणे महापालिकेच्या नजीकच्या आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा.असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -