घरठाणेडोंबिवलीकरांनो सावधान; नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तुपाची विक्री, ५ जणांना अटक

डोंबिवलीकरांनो सावधान; नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तुपाची विक्री, ५ जणांना अटक

Subscribe

नामांकित कंपनी नावाखाली ठाणे जिल्हयातील डोंबिवली कल्याणमध्ये बनावट तुपाची विक्री करणाऱ्या एका टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने डोंबिवली पूर्वेतील गोग्रास वाडी येथे एका ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट तूप जप्त केले असून या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या गोरख धंद्यात ठाणे जिल्हयातील बडे व्यापारी यांचा सहभाग असल्याचा शक्यता वर्तवण्यात येत असून लवकरच या बड्या व्यापाऱ्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बनावट तसेच भेसळयुक्त तूप, डालडा यासारखे खाद्य पदार्थ नामंकित कंपनीच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटकी ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी डोंबिवली पूर्व येथील गोग्रास वाडी, पाथर्ली रोडवरील पार्वती निवास येथील एका घरात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात असता त्या ठिकाणी मोठ्या श्रीकृष्णा, गोवर्धन, अमूल, सागर आणि ओम कृष्णा या नामांकित कंपनीचे पॅकिंग असलेले तुपाच्या पिशव्या मिळून आल्या. या पिशव्यांमध्ये नामंकित कंपनीचे तूप नसून निकृष्ट दर्जा बनावट तूप असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पेश देवेंद्र गोर (३६) आणि जिम्मी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ८३ लिटर पॅकिंग केलेल्या तुपाच्या पिशव्या आणि डब्बे असा एकूण ४४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात फसवणूक, बोगस दस्तऐवज तयार करणे आणि कॉपी राईट कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा गोरख धंद्याचे जाळे केवळ डोंबिवली शहरापुरते नसून संपूर्ण ठाणे जिल्हयात पसरले आहे. हे बनावट तूप ठाणे शहरातील घोडबंदर रोड येथे तयार होऊन त्यांची विक्री ठाणे जिल्ह्यासह पालघर विरार आणि मुंबईत देखील करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी डोंबिवली येथून दोघांना तर ठाणे आणि इतर ठिकाणाहून तिघांना असे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात बनावट तुपाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. या गोरख धंद्यात ठाणे, डोंबिवली,कल्याण आणि इतर शहरातील बडे व्यापारी गुंतलेले असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -