ठाण्यातील शाळा, विद्यालये बंदच महापालिकेकडून पत्रक जारी

school close

मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिकेनेही ठाण्यातील शाळा, कॉलेज बंदच राहणार असल्याचे सांगितले आहे. ठाणे महापालिकेने पत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्यामुळे १५ जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्या सहाय्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना देण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.
ठाणे महापालिकेचे उपआयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी काढलेल्या पत्रकानुसार शाळांतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शासनाने यापूर्वी पारित केलेल्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी परिपत्रकानुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंत ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाच्या स्वरुपाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच ठाण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची आलेली दुसरी लाट आणि इतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा तसेच विद्यालये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेण्यात आल्या होत्या. ही मुदत १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा तसेच विद्यालये बंद ठेवणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.