Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेThane: ठाण्यातील अनिश्चितता कोणाच्या पथ्यावर

Thane: ठाण्यातील अनिश्चितता कोणाच्या पथ्यावर

Subscribe

शिवसेना, राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा युतीला कि आघाडीला होणार?

ठाणे । मागील निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकसंध होते. परंतु आता स्थिती बदलली असल्याने राजकीय गणितांचेही विभाजन झाले आहे.

ठाण्यात कोपरी पाचापाखाडी मतदारसंघ स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अंगणातील असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे केंद्रस्थान बनले असून शिंदे गटाने आपली पूर्ण ताकद या ठिकाणी लावली आहे.

- Advertisement -

ठाणे शहर मतदारसंघात राजन विचारे आणि संजय केळकर यांच्यात नितीन गडकरी यांनी घेतलेल्या सभेमुळे आणि या भागातील हिंदू मतांमुळे केळकर यांचे पारडे जड आहे, भाजपासाठी ही जागा कमालीची प्रतिष्ठेची आहे. तर शिवसेना (राजन विचारे) आणि मनसे (अविनाश जाधव) यांच्यातील मतविभाजनामुळे त्याचाही फायदा केळकर यांना होण्याची शक्यता आहे.

ओवळा माजिवडा हा मतदारसंघ दोन्ही शिवसेनेत नरेश मणेरा आणि प्रताप सरनाईक अशी थेट उभी लढत दाखवणारा आहे. या मतदारसंघातून ठाण्यातील मूळ बाळासाहेबांची शिवसेना ही शिंदे किंवा ठाकरे यापैकी कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट करणारी आहे.

- Advertisement -

कल्याण पूर्वेत ५८.५६ तर पश्चिमेत ५५.१५ इतके मतदान झाले आहेत. मतांची टक्केवारी वाढल्याने ही वाढलेली मते कोणाची यामुळे उमेदवारांमध्ये धास्ती आणि दिलासा अशी परिस्थिती आहे. कल्याण पूर्वे भाजपाच्या ताब्यात असून यापूर्वी तीन वेळेस गणपत गायकवाड निवडून आले होते. मात्र गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बंड पुकारत सुलभा गायकवाड या महायुतीच्या उमेदवारा विरोधात रान पेटविले आहे. त्या ठिकाणाहून महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे धनंजय बोडारे या तिरंगी लढतीत उभे ठाकले आहेत. महेश गायकवाड यांनी बंड केल्याने त्या तिरंगी लढतीत विजय कोण खेचून आणतोय हे मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर आहेत. नरेंद्र पवार आणि वरुण पाटील यांनी बंडखोरी करत त्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळीच लक्ष घातल्याने हे बंड शमले. महाविकास आघाडीचे सचिन बासरे यांना या भागातील सेक्युलर मतांवर भिस्त आहे. महायुतीतील राष्ट्रवादीची मते बासरे यांच्याकडे वळल्यास भोईर यांच्या अडचणी वाढू शकतात.

मुरबाड मतदारसंघात विद्यमान आमदार किसन कथोरे यांचा दांडगा जनसंपर्क असून भाजप पक्षापेक्षा त्यांनी केलेली कामे आणि लोकपयोगी नेते या त्यांच्या व्यक्तीगत प्रतिमेचा लाभ त्यांना होणार आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचार आंदोलनाचा परिणाम या ठिकाणी जनमतात दिसून येणार नाही, याची काळजी भाजपाने घेतली आहे.
त्यातही बदलापूरचा काही भाग त्यापेक्षा मुरबाडमधून त्यांच्या पाठिशी जनमत असल्याचे बोलले जाते.

अंबरनाथमध्ये राजेश वानखडे आणि बालाजी किणीकर अशी थेट लढत आहे. या ठिकाणी अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांच्यातील वादामुळे किणीकर यांची ताकद दुभंगली होती, त्याचा फायदा राजेश वानखडे यांना होण्याची शक्यता आहे. परंतु स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी जोर लावल्याने त्याचा आणि भाजपाच्या मतांचा फायदा किणीकर यांना होऊ शकतो.

भिवंडी पूर्वमध्ये काँटे की टक्कर असून रईस शेख (समाजवादी), संतोष शेट्टी (शिवसेना शिंदे गट) हे प्रमुख उमेदवार आहेत. रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना उबाठा गटाने हाकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे संतोष शेट्टी यांचे पारडे जड आहे. रईस शेख यांच्या स्थानिक कामे आणि लोकसंपर्कामुळे सोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सहानुभूतीमुळे रईस शेख यांना फायदा होऊ शकतो, मात्र दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, परंतु संतोष शेट्टी यांचे पारडे जड असल्याचे जाणवते.

भिवंडी पश्चिमेत महायुतीकडून महेश चौगले तर समाजवादीकडून रियाझ आजमी आणि तिसरे माजी महापौर विलास पाटील (अपक्ष) तर चौथे उमेदवार काँग्रेसचे दयानंद चोरघे अशी लढत आहे. भिवंडी पश्चिमेत मराठी, मारवाडी, गुजराती गट म्हणजेच हिंदू मतांचा टक्का अधिक असल्याने हे एकगठ्ठा मतदान महेश चौघुले मिळण्याची शक्यता आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये दोन्ही शिवसेनेत लढत होती. शिंदे गटाकडून शांताराम मोरे आणि ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांच्या प्रमुख लढत आहे. मागील अडीच वर्षात शिंदे सरकार आल्यापासून कोट्यावधींचा निधी शांताराम मोरे या विद्यमान आमदारांनी मिळवून दिला ही जमेची बाजू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची जागा केल्याने त्यांनी ताकद लावली होती. महादेव घाटाळ माजी जिल्हा परिषद सदस्य होते. तर आगरी समुदायाकडून त्यांना चांगला पाठिंबा होता.

कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजेश मोरे यांच्यासाठी ताकद लावली होती. ठाण्यात लोकसभेला नरेश म्हस्के पॅटर्न चालवल्यासारखाचा या मतदार संघात मोरे यांच्यासाठी पॅटर्न राबवण्यात आला. मनसेचे राजू पाटील हे आमदार असल्याने त्यांनी आपली पकड या ठिकाणी मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी शिंदे सरकारवर निधीवाटपातू दुजाभाव आणि असकार्याचा आरोप केला होता. या आरोपावर येथील जनता किती विश्वास ठेवते हे आज निकालावरून लक्षात येईल. शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर हे माजी आमदार असल्याने त्यांची पकड या ठिकाणी कायम होती. तसेच ठाणे महापालिकेतही त्यांचे वर्चस्व असल्याने दिवा शहराच्या विकासाचा मुद्दा त्यांच्या बाजूने होता.

डोंबिवलीत शिंदे शिवसेना गटातून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले दिपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते, हा निकाल त्यांच्या पक्षांतरांचा परिणामही दाखवून देणार आहे. तसेच भाजपाचे रवींद्र चव्हाणांच्या पाठिशी डोंबिवलीतील हिंदू जनसमुदाय असल्याने त्यांची ही जमेची बाजू आहे.

उल्हासनगरात बहुआयामी निवडणूक असणार आहे. ओमी कलानींची महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मतांवर भिस्त आहे. तर येथील परंपरागत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील सिंधी समुदायाची मते शिवसेनेकडे एकेकाळी होती. ती ही मते भाजपाच्या पारड्यात जाणारी आहेत त्याचा लाभ कुमार आयलानी यांना होणार आहे. तर नुकतेच मनसेत दाखल झालेले भगवान भालेराव हे वंचित दलित समुदायातील पार्श्वभूमीमुळे महत्वाचे नेते आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडीचे संजय गुप्ता यांच्यामुळे याही मतांचे विभाजन होणार आहे.

शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा (मविआ), दौलत दरोडा ( महायुती), रंजना उघडा (अपक्ष) रिंगणात आहेत. यातील रंजना उघडा या भाजपामध्ये दहा वर्षे सक्रीय होत्या. त्यामुळे दरोडा यांच्या मतांमध्ये विभाजनाची शक्यता आहे. त्याचा फायदा बरोरांना होऊ शकतो.

कळवा मुंब्रा मतदारसंघात एकसंध राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांची मुस्लीम मतदारांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेमुळे एकहाती पकड आहे, परंतु यंदा रईस शेख यांनी राष्ट्रवादी फुटल्यावर येथील हक्काची मते फोडून कडवे आव्हान उभे केले आहे, शेख यांना थेट अजित पवार यांचा पाठिंबा आहे सोबतच महायुती सरकारमधून या भागात पुरेसा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आव्हाडांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तसेच दुसर्‍या बाजूला लाडकी बहिण योजनेमुळेही आव्हाडांसाठी आव्हान उभे राहिले आहे.

– संजय सोनवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -