मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून गणेशमूर्तीची भेट

 तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले आहेत. पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांना श्री गणरायाची मूर्ती भेट देत कपिल पाटील यांनी नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे मूळ गाव आहे. मात्र, त्यांच्या मूळ गावात रेल्वे पोचली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुरबाडवासियांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण केले. या रेल्वेमार्गाचा गतीशक्ती योजनेत समावेश करण्यात आला. जमीन अधीग्रहणाबरोबरच, महाराष्ट्र सरकारकडून रेल्वेच्या कामासाठी देण्यात येणाऱ्या ५० टक्के वाट्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच कल्याण-मुरबाड रेल्वेचे स्वप्न साकार झाले, अशी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची भावना आहे. त्यादृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कपिल पाटील यांनी भेट घेतली. तसेच त्यांना श्री गणरायाची मूर्ती भेट म्हणून देत भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्यावतीने आभार मानले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंचायती राज विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली. तसेच त्यांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या.