पुस्तकांच्या घराचा वर्धापन दिन पुस्तक दिंडीने उत्साहात साजरा

मनिषानगर, कळवा, ठाणे येथे माजी नगरसेविका अपर्णा साळवी आणि माजी नगरसेवक मिलिंद साळवी यांच्या संकल्पनेतून बनविण्यात आलेल्या पुस्तकांच्या घराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मराठी राज्यभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पार पाडलेल्या या कार्यक्रमामध्ये पुस्तक दिंडी काढण्यात आली. मनिषा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व विभागातील अनेक वाचनप्रेमी नागरीक या दिंडीमध्ये उस्फूर्ततेने सामिल झाले होते. नागरीकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती वाढावी आणि पुस्तकांच्या घराचा प्रसार व्हावा, या करीता ही दिंडी काढण्यात आली.

वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, पंचागकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण आणि मेधाताई सोमण – साहित्यिक व संस्कृत अभ्यासिका यांचे मार्गदर्शन आणि व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले. मिलिंद बल्लाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्याचे महत्व उपस्थितांना आपल्या सहज सोप्या भाषा शैलीने पटवून दिले. तर दा. कृ. सोमण यांनी आपल्या खुमासदार शैलीने पंचाग आणि खगोलशास्त्रातील माहिती सांगत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सांगता अपर्णा साळवी यांनी या उपक्रमाकरता पाठिंबा देणार्‍या माजी महापौर मनोहर साळवी, या उपामाची संकल्पना मांडणारे माजी नगरसेवक मिलिंद मनोहर साळवी आणि उपस्थित नागरीकांचे आभार मानून केली.