प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सेवानिवृत्त शिपाई बनला बोगस डॉक्टर

दोन आदिवासींचा मृत्यू, गुन्हा दाखल

बदलत्या हवामानात थंडी ताप अंगदुखी सारखे आजार बळावल्याने गोरगरीब कमी पैशांत उपचार करुन घेण्यासाठी तज्ज्ञ नसलेल्या बोगस डाॅक्टरांकडे जाऊन आपला जीव धोक्यात घालत आहेत.अशाच एका वैद्यकिय सेवेतून शिपाई म्हणून निवृत्त झालेल्या पांडुरंग घोलप या बोगस डाॅक्टरने दोन निष्पाप गोरगरीब आदिवासी बांधवांचा जीव घेतला आहे. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले अनेक वर्षे शिपाई असलेले पांडुरंग दगडू घोलप हे सेवेत असतांना दवाखान्यात स्वतःला डाॅक्टर म्हणून घेत होते. तसेच गोरगरीबांंवर उपचार करीत असल्याचा आरोप आहे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरात दवाखाना थाटून उपचार सुरु केले.

सरकारी दवाखान्यापेक्षा या बोगस डाॅक्टरवर विश्वास ठेवून गोरगरीब, आदिवासी बांधव  त्याच्याकडून उपचार करुन घेत होते. 24 आणि 26 जानेवारी 2022 रोजी  धसई परीसरात आदिवासी बांधवांवर चुकीचे उपचार केल्याने  राम भिवा आसवले (रा.मिल्हे), आलका रविंद्र मुकणे (रा.मिल्हे)  यांचा मृत्यू झाला. याबाबत टोकावडे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमोडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने या बोगस डाॅक्टरवर टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आल्याची माहिती पोलिस हवालदार नितीन घाग यांनी दिली. यातील आरोपी बोगस डाॅक्टर फरार झाला आहे. या डाॅक्टरवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी केली.